कोल्हापूर : गोकुळशिरगाव येथे एकाचा होरपळून मृत्यू ; तीन केबिनही खाक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 29, 2017 12:20 PM2017-12-29T12:20:31+5:302017-12-29T12:23:51+5:30
गोकुळशिरगाव एम.आय.डी.सी.फाटयावर औद्योगिक वसाहतीकडे जाणाऱ्या सेवा मार्गावरील रस्त्याशेजारी व्यावसायिकांच्या असलेल्या तीन लाकडी केबिन (खोकी) खाक झाल्या. यामध्ये एका व्यक्तीचा होरपळून जागीच मृत्यू झाला. यामध्ये केबिनचे तीस हजारांहून अधिक नुकसान झाले.
कणेरी : गोकुळशिरगाव एम.आय.डी.सी.फाटयावर औद्योगिक वसाहतीकडे जाणाऱ्या सेवा मार्गावरील रस्त्याशेजारी व्यावसायिकांच्या असलेल्या तीन लाकडी केबिन (खोकी) खाक झाल्या. यामध्ये एका व्यक्तीचा होरपळून जागीच मृत्यू झाला. यामध्ये केबिनचे तीस हजारांहून अधिक नुकसान झाले. आग कागल पंचातारांकित औद्योगिक वसाहतीमधील अग्निशमन दलाने आटोक्यात आणली. ही घटना बुधवारी रात्री बाराच्या सुमारास घडली. आग नेमकी कशाने लागली, हे अद्याप स्पष्ट झालेले नाही.
याबाबत घटनास्थळावरून व गोकुळशिरगाव पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, गोकुळशिरगाव एम.आय.डी.सी.फाट्यावर औद्योगिक वसाहतीकडे जाणाऱ्या सेवा मार्गावरील रस्त्याशेजारी काही व्यावसायिक खोकी आहेत. यामध्ये मध्यभागी असलेल्या तीन खोक्यांना बुधवारी रात्री बाराच्या सुमारास अचानक आग लागली.
लाकडी बांबू, तट्टे आणि पत्र्याचा वापर करून ही खोकी तयार करण्यात आली आहेत. यातील एका खोक्यात मटक्याचा, तर दुसऱ्या खोक्यात मोटारसायकल पंक्चर आणि चपलांचा व्यवसाय केला जात होता. तर तिसऱ्या खोक्यात वाहनांच्या कोचिंगचे काम केले जात होते. ही तिन्ही खोकी खाक झाली आहेत.
यामध्ये एका चाळीस ते पंचेचाळीस वयोगटाच्या अज्ञात व्यक्तीचा होरपळून जागीच मृत्यू झाला. रात्री बारा वाजता औद्योगिक वसाहतीमधील कर्मचारी कामावरून घरी जात असताना त्यांच्या निदर्शनास ही घटना आली. त्यांनी याबाबतची माहिती गोकुळशिरगाव पोलिसांना दिली.
घटनास्थळी पोलिसांनी भेट देऊन अग्निशमन दलाला पाचारण केले. तोपर्यंत दोन खोकी खाक झाली होती. मटक्याच्या खोक्यात अज्ञात व्यक्ती झोपली होती. त्याचा आगीत होरपळून मृत्यू झाला. अग्निशमन दलाने ही आग आटोक्यात आणली.
दरम्यान, करवीरचे विभागीय पोलीस अधिकारी सूरज गुरव यांनी भेट देऊन घटनेची पाहणी केली. आगीच नेमक कारण अद्याप स्पष्ट होऊ शकले नाही. तसेच मृत व्यक्तीची ओळख पटविण्यात पोलिसांना यश आलेले नाही. गुरुवारी सकाळी नागरिकांनी घटनास्थळी पाहण्यासाठी गर्दी केली होती. या घटनेची नोंद गोकुळशिरगाव पोलिसांत झाली असून, अधिक तपास स.पो.नी. संजय नागरगोजे करीत आहेत.
गोकुळशिरगाव एम.आय.डी.सी.फाट्यावर औद्योगिक वसाहतीकडे जाणाऱ्या सेवा मार्गावरील रस्त्याशेजारील तीन खोकी खाक झाली. यामध्ये एका अज्ञात व्यक्तीचा होरपळून जागीच मृत्यू झाला.