कोल्हापूर : विवेकानंद, गोखले कॉलेजचे प्रवेशाबाबत आॅनलाईन पाऊल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 13, 2018 06:03 PM2018-06-13T18:03:09+5:302018-06-13T18:03:09+5:30
पदवी अभ्यासक्रमासाठी आॅनलाईन प्रवेश प्रक्रिया यावर्षी विवेकानंद महाविद्यालय आणि गोपाळकृष्ण गोखले कॉलेज राबविणार आहे. त्याच्या आॅनलाईन पावलामुळे विद्यार्थ्यांचा वेळ वाचणार असून त्रास कमी होणार आहे.
संतोष मिठारी
कोल्हापूर : पदवी अभ्यासक्रमासाठी आॅनलाईन प्रवेश प्रक्रिया यावर्षी विवेकानंद महाविद्यालय आणि गोपाळकृष्ण गोखले कॉलेज राबविणार आहे. त्याच्या आॅनलाईन पावलामुळे विद्यार्थ्यांचा वेळ वाचणार असून त्रास कमी होणार आहे.
कोल्हापूर शहरातील अकरावीची प्रवेश प्रक्रिया गेल्या पाच वर्षांपासून केंद्रीय पद्धतीने राबविली जात आहे. त्याचा चांगला परिणाम झाला आहे. त्या पद्धतीने पदवी अभ्यासक्रमासाठी केंद्रीय आणि आॅनलाईन प्रक्रिया राबविण्याची मागणी विद्यार्थी, पालकांतून गेल्या तीन वर्षांपासून होत आहे.
ही मागणी लक्षात घेऊन यावर्षी विवेकानंद महाविद्यालय आणि गोखले कॉलेजने पदवी अभ्यासक्रमासाठी आॅनलाईन प्रक्रिया राबविण्याचा निर्णय घेतला आहे. विवेकानंद महाविद्यालयातर्फे पदवी प्रथम वर्षासाठी आॅनलाईन प्रवेश प्रक्रिया गेल्या चार दिवसांपासून सुरू केली आहे. त्यात प्रवेश भरणे, गुणवत्ता यादी प्रसिद्ध करण्यासह शुल्क भरण्याची प्रक्रिया आॅनलाईन होणार आहे.
गोखले कॉलेज यावर्षी बारावी आणि पदवी द्वितीय, तृतीय वर्षासाठी आॅनलाईन प्रक्रिया राबवत आहे. या प्रक्रियेअंतर्गत कॉलेजमधील बारावीचे ८० टक्के प्रवेश पूर्ण झाले आहेत. द्वितीय वर्षाची प्रक्रिया दि. १८ जूनपासून सुरू होणार आहे. त्यानंतर तृतीय वर्षाची प्रक्रिया होईल. प्रवेश प्रक्रियेबाबत या महाविद्यालयातील टाकलेले आॅनलाईनचे पाऊल विद्यार्थ्यांसाठी उपयोगी ठरणारे आहे.
विविध सूचना देण्याची सुविधा
महाविद्यालयातून अर्ज घेणे, तो भरून पुन्हा जमा करणे. प्रवेश शुल्क भरणे, अर्जांची छाननी करून गुणवत्ता यादी प्रसिद्ध करणे. त्यानंतर प्रत्यक्ष प्रवेश देणे अशी प्रक्रिया सध्या राबविली जाते. त्यात किमान तीन आठवडे जातात. या प्रक्रियेसाठी विद्यार्थ्यांना वारंवार महाविद्यालयांमध्ये यावे लागते. त्यात त्यांचा वेळ आणि पैसा खर्च होतो.
ते टाळण्याच्या अनुषंगाने विवेकानंद महाविद्यालय, गोखले कॉलेज यांनी आॅनलाईन प्रक्रिया राबविण्याचा निर्णय घेतला आहे. आॅनलाईन पद्धतीमुळे या महाविद्यालयांतील प्रवेश प्रक्रियेला गती मिळणार आहे. त्यासह या प्रक्रियेतील विविध सूचना ‘एसएमएस’द्वारे विद्यार्थ्यांना मिळणार आहेत.
प्रवेश प्रक्रिया विद्यार्थ्यांसाठी अधिक सोयीस्कर व्हावी म्हणून आमच्या महाविद्यालयाने पदवी प्रथम वर्षाची प्रवेश प्रक्रिया आॅनलाईन केली आहे. टप्प्या-टप्याने त्याची व्याप्ती वाढविण्यात येईल.
-प्राचार्य डॉ. एस. वाय. होनगेकर,
विवेकानंद महाविद्यालय