कोल्हापूर : बहारदार सादरीकरणाने बालनाट्य स्पर्धेचा पडदा उघडला, बालमनाच्या भावविश्वाशी जोडलेल्या विषयांना स्पर्श
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 6, 2018 03:38 PM2018-01-06T15:38:43+5:302018-01-06T15:43:30+5:30
अभ्यासी पोेपटपंची करणारी बालपिढी, ग्रंथालयांचे महत्व, बालकांच्या समस्या आणि त्यावर उपाययोजना अशा बालमनाच्या भावविश्वाशी जोडलेल्या विषयांना स्पर्श करत झालेल्या बहारदार सादरीकरणाने महाराष्ट्र राज्य बालनाट्य स्पर्धेचा पडदा शनिवारी उघडला.
कोल्हापूर : अभ्यासी पोेपटपंची करणारी बालपिढी, ग्रंथालयांचे महत्व, बालकांच्या समस्या आणि त्यावर उपाययोजना अशा बालमनाच्या भावविश्वाशी जोडलेल्या विषयांना स्पर्श करत झालेल्या बहारदार सादरीकरणाने महाराष्ट्र राज्य बालनाट्य स्पर्धेचा पडदा शनिवारी उघडला.
कोल्हापुरातील केशवराव भोसले नाट्यगृहात सुरू झालेल्या या स्पर्धेचे उदघाटन नाट्यगृहाचे व्यवस्थापक विजय वणकुद्रे, लिपीक उदय माने, परीक्षक सुरेश पुरी, रमेश भिशीकर, सारीका पेंडसे यांच्या हस्ते झाले.
या स्पर्धेचा पडदा उघडला तो यापूर्वीच्या राज्य नाट्य स्पर्धांमध्येही पारितोषिक मिळवलेल्या शिंदे अॅकॅडमीच्या सोनेरी पिंजऱ्यातील पोपट या नाटकाने. आजच्या शिक्षण व्यवस्थेवर भाष्य करणाऱ्या या नाटकात केवळ पुस्तकी पोपटपंची आणि घोकंपट्टी करणाऱ्या बालमनाच्या व्यथा आणि पालकांची मानसिकता मांडली आहे.
केवळ परीक्षेत अव्वल येणारे विद्यार्थी पुढे आयुष्यात यशस्वी होतीलच असे नाही. ही मुलेशिक्षण पद्धतीत भरडली जात असताना आपल्या कलाकौशल्य, अंगभूत गुणांपासून वंचित झालेली असतात.
इंग्रजी माध्यमाच्या महागड्या शाळा, भक्कम फी घेणारे क्लासेस, पालकांच्या मोठ्या अपेक्षा, शिक्षकांचा प्रमाणाबाहेर हस्तक्षेप यामुळे आजचा विद्यार्थी सोनेरी पिंजऱ्यांत अडकला आहे. सोन्याचा असला तरी तो पिंजरात आहे हे पालकांनी विसरता कामा नये. अन्यथा विद्यार्थ्यांच्या वाट्याला निराशेचे काळे ढग येतात असा मतितार्थ या नाटकाने मांडला.
डॉ. सतिश साळूंखे यांचे लेखन असलेल्या या नाटकाचे दिग्दर्शन सुनिल शिंदे यांनी केले आहे. नेपथ्य रजत सोनार व शुभम सोनारचे असून प्रकाशयोजना प्रसन्न देशमुख, अजय इंगवले यांनी केली आहे. रंगभूषा व वेशभूषा ललिता शिंदे यांची असून गौतम राजहंस यांनी संगीत दिले आहे.
नाटकात आकांक्षा देशमुख, ऋषिकेश गुदगे, रमा कुलकर्णी, भाग्यदा नाईक, पुण्यदा नाईक, स्वरा कलस, आदित्यराजे सूर्यवंशी, निरज कौलगी, सूजल बेलवलकर, अद्वैत फणसळकर, ओंकार कोकाटे, विदुला चौगूले, वेदांत कांबळे, आर्या फणसळकर या विद्यार्थ्यांनी भूमिका निभावल्या.
व्यंकटेश्वरा इंग्लिश स्कूल (शांती अन् चेतन), विद्या प्रसारक मंडळ (बसराची ग्रंथपाल), विद्यापीठ हायस्कूल (माझं काय चुकलं?), आचरेकर प्रतिष्ठान (निसर्गचित्र), श्रीवरा व्यंकटेश्वरा चॅरिटेबल ट्रस्ट (वाट चुकलेली माणसं) या संस्थांची नाटके सादर झाली.
रविवारची नाटके (सकाळी दहा वाजल्यापासून)
निवडक (पल्लवी जोशी), मदर्स डे (सदगुरूपंत महाराज शिक्षण मंडळ, इचलकरंजी), गुलमकई(श्रीराम दयाळ मालू हायस्कूल सांहली), जयोस्तुते (गंगामाई गर्ल्स हायस्कूल इचलकरंजी), गोष्ट पछाडलेल्या वाड्याची(ए.बी.पाटील इंग्लिश स्कूल सांगली), वृक्षवल्ली(सरस्वती वाचनालय बेळगाव), वयम मोठम खोटम (म.के. आठवले विनय मंदिर सांगली.)