कोल्हापूर : खुलणार मातृलिंग मंदिराचे मूळ सौंदर्य, रंगकाम काढण्यास सुरुवात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 4, 2018 11:34 AM2018-09-04T11:34:48+5:302018-09-04T11:39:06+5:30
करवीर निवासिनी श्री अंबाबाईच्या वरच्या मजल्यावर असलेल्या पुरातन मातृलिंग मंदिराच्या दगडी भिंतींना करण्यात आलेली रंगरंगोटी काढून टाकण्याला सुरुवात करण्यात आली.
कोल्हापूर : करवीर निवासिनी श्री अंबाबाईच्या बरोबर वरच्या मजल्यावर असलेल्या पुरातन मातृलिंगमंदिराचे मूळ सौंदर्य आता खुलून येणार आहे. त्यासाठी पश्चिम महाराष्ट्र देवस्थान व्यवस्थापन समितीने प्रयत्न सुरू केले असून, सोमवारी मंदिराच्या दगडी भिंतींना करण्यात आलेली रंगरंगोटी काढून टाकण्याच्या कामाला सुरुवात करण्यात आली.
श्री अंबाबाई मूर्तीच्या मस्तकावर आणि मंदिरावरही शिवलिंग विराजमान आहे. मंदिराच्या अंतर्गत रचनेत दोन मजले करण्यात आले असून, खाली गाभाऱ्यात श्री अंबाबाईची मूर्ती आणि बरोबर वरच्या मजल्यावर मातृलिंग प्रतिष्ठापित करण्यात आला आहे.
हे मंदिर केवळ श्रावण सोमवारी व अन्य महत्त्वाच्या सणांना भाविकांसाठी खुले केले जाते. मात्र सुमारे ५०-६० वर्षांपूर्वी या मंदिराच्या दगडी भिंतींना पांढरा रंग दिल्याने त्याचे मूळ सौंदर्यच लुप्त झाले होते.
मातृलिंग व परिसरातील चुन्याचा गिलावा व रंग काढण्याबाबतची सूचना पुरातत्व खात्याचे तत्कालीन अधिकारी डॉ. एम. एल. सिंग यांनी २०१५च्या अहवालामध्ये केली आहे. त्यानुसार कोल्हापूर हेरिटेज कॉन्झर्वेशन कमिटीच्या मार्गदर्शनाखाली देवस्थान समितीने दगडी भिंतींवरील रंग काढण्यासाठी ती परवानगी घेतली.
सोमवारी पश्चिम महाराष्ट्र देवस्थान व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष महेश जाधव, खजिनदार वैशाली क्षीरसागर, सदस्य शिवाजीराव जाधव, संगीता खाडे, सचिव विजय पोवार, सहसचिव शिवाजी साळवी, व्यवस्थापक धनाजी जाधव यांच्या, अभियंता सुदेश देशपांडे, उपअभियंता सुयश पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत या उपक्रमाला सुरुवात करण्यात आली.
हे काम कोल्हापूरचे, मात्र मुंबईत चार्टर्ड इंजिनिअर म्हणून काम करत असलेले अभिजित साळोखे हे स्वखर्चातून करून देणार आहेत. यामुळे मंदिराचे मूळ सौंदर्य खुलणार असून, भाविकांना काही दिवसांतच हे मंदिर वेगळ््या रूपात दिसणार आहे.