कोल्हापूर : जिल्ह्यात पावसाची उघडीप, शहरात ऊन : अद्याप पंधरा बंधारे पाण्याखाली
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 29, 2018 06:31 PM2018-06-29T18:31:41+5:302018-06-29T18:35:12+5:30
कोल्हापूर जिल्ह्यात पावसाने काहीशी उसंत घेतली असून, शुक्रवारी दिवसभर उघडीप राहिली. कोल्हापुरात शहरात तर खडखडीत ऊन पडले होते. विविध नद्यांवरील पंधरा बंधारे अद्याप पाण्याखाली असून, धरणक्षेत्रात पावसाची रिपरिप कायम राहिली आहे.
कोल्हापूर : जिल्ह्यात पावसाने काहीशी उसंत घेतली असून, शुक्रवारी दिवसभर उघडीप राहिली. कोल्हापुरात शहरात तर खडखडीत ऊन पडले होते. विविध नद्यांवरील पंधरा बंधारे अद्याप पाण्याखाली असून, धरणक्षेत्रात पावसाची रिपरिप कायम राहिली आहे.
गुरुवारी दिवसभर जिल्ह्यात अधूनमधून पावसाच्या जोरदार सरी कोसळत होत्या. सरसर येणाऱ्या सरी पाणीच पाणी करीत होत्या; पण शुक्रवारी सकाळपासून पावसाने काहीशी उसंत घेतली. सकाळी हलक्या सरी कोसळल्यानंतर पावसाने एकदम उघडीप दिली. कोल्हापूर शहरात तर दिवसभर ऊन राहिले. सायंकाळनंतर पावसाच्या सरी कोसळत राहिल्या.
शुक्रवारी सकाळी आठपर्यंत संपलेल्या चोवीस तासांत जिल्ह्यात सरासरी २२.२४ मिलिमीटर पाऊस झाला असून, गगनबावडा तालुक्यात सर्वाधिक ६४ मिलिमीटर पावसाची नोंद झाली. धरणक्षेत्रातही दमदार पाऊस झाला. कासारी धरणक्षेत्रात १८०, !घटप्रभा’मध्ये १६४, तर कोदे धरणक्षेत्रात १६६ मिलिमीटर पाऊस झाला.
पावसाचा जोरदार ओसरल्याने नद्यांच्या पाणीपातळीत घट झाली आहे. पंचगंगेची पातळी दोन फुटांनी खाली आली असून, शुक्रवारी सायंकाळी ती २१.१ फुटांपर्यंत राहिली.
घरांच्या पडझडीत ४० हजारांचे नुकसान
जिल्ह्यात शुक्रवारी सकाळपर्यंत दोन घरांची पडझड होऊन सुमारे चाळीस हजारांचे नुकसान झाले आहे. मौजे महिपालगड (ता. चंदगड) येथील वनिता विठ्ठल मोरे यांचा वीज पडून मृत्यू झाला होता. त्यांच्या वारसांना जिल्हा प्रशासनाच्या वतीने चार लाखांची मदत देण्यात आल्याची माहिती आपत्ती व्यवस्थापन विभागाने दिली.
तालुकानिहाय पाऊस मिलिमीटरमध्ये असा -
हातकणंगले (३.७५), शिरोळ (१.००), शाहूवाडी (३९.००), राधानगरी (३०.१७), गगनबावडा (६४.००), करवीर (७.३६), कागल (४.७१), गडहिंग्लज (३.२८), भुदरगड (११.००), आजरा (२८.७५), चंदगड (४८.००).