कोल्हापूर : विनाअनुदानित महाविद्यालयातील प्राध्यापकांची निदर्शने
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 20, 2018 04:42 PM2018-08-20T16:42:58+5:302018-08-20T16:45:07+5:30
विविध प्रलंबित मागण्यांसाठी राज्य (कायम) विनाअनुदानित उच्च माध्यमिक कमवि शाळा कृ ती समितीच्या नेतृत्वाखाली प्राध्यापकांनी सोमवारी शिक्षण उपसंचालक कार्यालयासमोर निदर्शने केली.
कोल्हापूर : विविध प्रलंबित मागण्यांसाठी राज्य (कायम) विनाअनुदानित उच्च माध्यमिक कमवि शाळा कृ ती समितीच्या नेतृत्वाखाली प्राध्यापकांनी सोमवारी शिक्षण उपसंचालक कार्यालयासमोर निदर्शने केली.
येथील शिक्षण उपसंचालक कार्यालयासमोर प्राध्यापक दुपारी दोनच्या सुमारास जमले. त्यानंतर याठिकाणी त्यांनी निदर्शने केली. ‘विनाअनुदानित कनिष्ठ महाविद्यालयातील प्राध्यापकांना अनुदान मिळालेच पाहिजे’, ‘पात्र यादी घोषित झालीच पाहिजे’, ‘अनुदान आमच्या हक्काचं’ अशा घोषणांनी परिसर दणाणून सोडला.
या आंदोलनात प्रा. बी. एस. बरगे, आर. एम. माळी, जे. ए. सातपुते, व्ही. एस. मस्कर, एस. व्ही. पारळे, अनुश्री सुतार, सुरेखा कुंभार, रोहिणी आयरेकर, भारती कदम, बी. जे. चौधरी, ए. बी. धायगुडे, आदी प्राध्यापक सहभागी झाले होते. निदर्शनानंतर आंदोलनकर्त्यांच्या शिष्टमंडळाने मागण्यांचे निवेदन शिक्षण उपसंचालक किरण लोहार यांना दिले.
प्रलंबित मागण्यांची शासनाकडून पूर्तता होत नसल्याने शाळा कृ ती समितीने आंदोलन सुरू केले आहे. दि. १० सप्टेंबरपासून मुंबईतील आझाद मैदान येथे बेमुदत धरणे आंदोलन केले जाणार असल्याचे प्रा. बरगे यांनी सांगितले.
विविध मागण्या
- * कायम शब्द वगळलेल्या उर्वरित उच्च माध्यमिक शाळा, कनिष्ठ महाविद्यालयातील तुकड्या, विभाग, विषय यांचा कायम शब्द वगळलेल्या तारखेपासून अनुदान द्यावे.
- अनुदानासाठी आर्थिक तरतूद करावी.
- मूल्यांकन पात्र शाळांची यादी जाहीर करावी.
- आॅनलाईन मूल्यांकनाचे आदेश देऊन मूल्यांकन प्रक्रिया तत्काळ सुरू करावी.
- सर्व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना वैयक्तिक मान्यता देण्यात यावी.
- कायम विनाअनुदानित कालावधीत काम केलेल्या सर्व शिक्षकांचे समायोजन करावे.
- स्वयंम अर्थसहाय्यित कायदा व धोरण रद्द करून पूर्वीप्रमाणे अनुदान द्यावे.