कोल्हापूर : राज्य सरकारी कर्मचाऱ्यांची सीपीआरमध्ये निदर्शने
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 4, 2018 03:51 PM2018-05-04T15:51:32+5:302018-05-04T15:51:32+5:30
राज्य सरकारी कर्मचारी मध्यवर्ती संघटनेच्या कोल्हापूर जिल्हा शाखेतर्फे येथील छत्रपती प्रमिलाराजे रुग्णालयाच्या (सीपीआर) जिल्हाशल्यचिकित्सक कार्यालयाजवळ शुक्रवारी सुमारे २० मिनिटे निदर्शने केली.
कोल्हापूर : राज्यशासनाने सार्वजनिक खासगी भागीदारी (पीपीपी) तत्वावर राज्यातील ३०० खाटांची रुग्णालये चालवायला देऊ नये या प्रश्नी राज्य सरकारी कर्मचारी मध्यवर्ती संघटनेच्या कोल्हापूर जिल्हा शाखेतर्फे येथील छत्रपती प्रमिलाराजे रुग्णालयाच्या (सीपीआर) जिल्हाशल्यचिकित्सक कार्यालयाजवळ शुक्रवारी सुमारे २० मिनिटे निदर्शने केली. यावेळी जिल्हाशल्यचिकित्सक डॉ. एल. एस. पाटील यांना निवेदन देण्यात आले.
सातारा जिल्हयातील महाबळेश्वर ग्रामीण रुग्णालय आणि प्राथमिक आरोग्य केंद्र, तळदेव व तापोळा ही दोन केंद्रे पाचगणी (ता. महाबळेश्र्वर) येथील इंडियन रेड क्रॉस सोसायटी संचलित बेल एअर हॉस्पिटल या संस्थेस एक वर्षाच्या कालावधीकरिता प्रायोगिक तत्वावर देण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे.
या निर्णयाला संघटनेचा आक्षेप आहे. याची कारणे म्हणजे तेथील नागरिकांना उत्तम आरोग्य सेवा , सुविधा मिळणार नाहीत.
३०० खाटांची ग्रामीण रुग्णालये व प्राथमिक आरोग्य केंद्रातील रिक्त पदे तत्काळ भरावीत. या रुग्णालयासाठी पुरेसा निधी शासनाने द्यावा. पण, शासन याचा विचार न करता खासगीकरण व कंत्राटीकरण धोरण राबविण्याचा शासनाचा उद्देश आहे.
त्याचबरोबर पीपीपी तत्वावार देणाऱ्या खासगी संस्थेस औषधे , उपकरणे, यंत्रसामुग्री , वेतन आदीवरील खर्चासाठी आरोग्य खाते प्रतिपूर्तीच्या स्वरुपात अनुदान देणार आहे. एकंदरीत, या सर्वांवर जिल्हाशल्यचिकित्सक ,जिल्हा आरोग्य अधिकारी व आरोग्य उपसंचालक यांचे नियंत्रण राहणार आहे.वरील बाबींचा विचार करुन शासनाने खासगीकरण व कंत्राटीकरण किंवा सार्वजनिक भागीदारी तत्वावर चालविण्याचा प्रयोग करु नये,अशी मागणी निवेदनात केली आहे.
मध्यवर्ती संघटनेचे जिल्हासरचिटणीस अनिल लवेकर यांच्या नेतृत्वाखाली ही निदर्शने करण्यात आली. निदर्शनात अध्यक्ष वसंत डावरे, ज्ञानेश्र्वर मुठे , संदीप नलवडे, सतीश ढेकळे, विजय बागडे, संजय क्षीरसागर, हाश्मत हावेरी, संजीवनी दळवी, चंद्रकांत मोरे, श्रीमंतिनी पाटील , रमेश पाटील, सुधीर आयरेकर आदींचा सहभाग होता.
याप्रश्नी शनिवारी जिल्हाधिकारी यांना शिष्टमंडळ भेटणार आहे. त्यांनाही याबाबतचे निवेदन देणार आहोत. पीपीपी तत्वाला आमचा विरोध आहे.
-अनिल लवेकर,
सरचिटणीस जिल्हा शाखा,कोल्हापूर.