कोल्हापूर : आझाद गल्लीतील नागरिकांची महापालिकेत निदर्शने
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 24, 2018 03:32 PM2018-05-24T15:32:27+5:302018-05-24T15:32:27+5:30
भाऊसिंगजी रस्त्याला लागून असलेल्या आझाद गल्लीत अस्वच्छतेमुळे डेंग्यूची साथ पसरली असून, याकडे आरोग्य विभाग दुर्लक्ष करीत असल्याच्या निषेधार्थ या परिसरातील नागरिकांनी बुधवारी दुपारी महानगरपालिकेत जाऊन निदर्शने केली.
कोल्हापूर : भाऊसिंगजी रस्त्याला लागून असलेल्या आझाद गल्लीत अस्वच्छतेमुळे डेंग्यूची साथ पसरली असून, याकडे आरोग्य विभाग दुर्लक्ष करीत असल्याच्या निषेधार्थ या परिसरातील नागरिकांनी बुधवारी दुपारी महानगरपालिकेत जाऊन निदर्शने केली.
यावेळी नागरिकांनी अतिरिक्त आयुक्त श्रीधर पाटणकर यांना निवेदन दिले. दरम्यान, तक्रारी आल्यानंतर मंगळवारपासून विशेष मोहीम घेऊन परिसरात स्वच्छतेबाबत खबरदारी घेतली असल्याची माहिती आरोग्य अधिकारी डॉ. दिलीप पाटील यांनी दिली.
आझाद गल्ली अरुंद असून तेथील गटारी तुंबलेल्या आहेत. खासगी इमारतींच्या बेसमेंटमध्ये घाणीचे साम्राज्य निर्माण झाले आहे. त्यामुळे डासांची उत्पत्ती होऊन डेंग्यूची साथ पसरली असल्याची या परिसरातील नागरिकांची तक्रार होती. स्वच्छतेकडे दुर्लक्ष होत असल्याचीही तक्रार काहींनी केली. त्यानंतर या परिसरात मंगळवारपासून विशेष मोहीम घेऊन स्वच्छता करण्यात आली. डास अंडीनाशक औषध, धूरफवारणीही करण्यात आली.
याबाबत आरोग्य अधिकारी डॉ. दिलीप पाटील, मुख्य आरोग्य निरीक्षक डॉ. विजय पाटील यांनी आझाद गल्ली येथे जाऊन परिसराची पाहणी केली. तसेच काही रुग्णांची विचारपूस केली. आझाद गल्ली येथील डॉ. हितेश गांधी यांच्या रुग्णालयात जाऊन रुग्णांवर केलेल्या उपचारांची तसेच त्यांच्या रक्ताच्या चाचण्यांचे अहवाल तपासले. त्यावेळी त्यांना डेंग्यूसदृश रुग्ण असल्याचे आढळून आले. मात्र त्यांपैकी कोणालाही डेंग्यू झाला नसल्याची बाब समोर आली.
त्यावेळी डॉ. पाटील यांनी डॉ. गांधी यांची कानउघाडणी करीत लोकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण होईल असे वागू नका, असा सल्ला दिला. मात्र नागरिकांनी डॉ. गांधी यांचीच बाजू घेत डॉ. पाटील यांचीच उलटतपासणी घेण्याचा प्रयत्न केला.
दुपारी चार वाजता नागरिक आयुक्तांनी भेटण्यासाठी महानगरपालिकेत गेले. त्यावेळी आयुक्त डॉ. अभिजित चौधरी एका बैठकीत व्यस्त होते. त्यामुळे नागरिक जेथे बैठक सुरू होती, त्या ताराराणी सभागृहाकडे गेले. त्यांना दरवाजावर रोखण्यात आले. त्यावेळी अतिरिक्त आयुक्त श्रीधर पाटणकर तेथे पोहोचले. पाठोपाठ डॉ. पाटीलसुद्धा तेथे गेले. मात्र आयुक्तांनी बाहेर येऊन चर्चा करावी, असा आग्रह काही नागरिकांनी धरला.
आयुक्तांनी त्यांना ‘आपल्या कार्यालयात बसा, मी येतो,’ असा निरोपही दिला. मात्र त्याने समाधान न झाल्याने नागरिकांनी अचानक आयुक्तांच्या निषेधाच्या घोषणा देण्यास सुरुवात झाली. डॉ. पाटील, नगरसेवक ईश्वर परमार यांच्या विरोधातही घोषणाबाजी करण्यात आली.
गेले दोन दिवस आझाद गल्ली परिसरात स्वच्छता मोहीम राबविण्यात येत आहे. योग्य ती खबरदारी घेतली जात आहे. संपूर्ण शहरभर डासनाशक औषध, धूरफवारणी केली जात आहे. खासगी शौचालयांच्या पाईपला फडकी बांधली जात आहेत. नागरिकांनी स्वत:देखील यात पुढाकार घेणे आवश्यक आहे.
- डॉ. दिलीप पाटील,
आरोग्याधिकारी
आझाद गल्ली येथे रोजच्या रोज स्वच्छता केली जाते. कचरा उठाव केला जातो. महापालिका आरोेग्य विभाग कुठेही कमी पडलेला नाही. गेल्या दोन दिवसांत ज्या-ज्या ठिकाणी पाणीची डबकी दिसून आली, तेथे औषधे टाकण्यात आली आहेत. मी स्वत: भागात फिरती करीत आहे.
- ईश्वर परमार,
नगरसेवक