कोल्हापूर : पदवी प्रथम वर्ष प्रवेशासाठी गर्दी, महाविद्यालयांतील प्रक्रिया सुरू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 18, 2018 05:38 PM2018-06-18T17:38:03+5:302018-06-18T17:38:03+5:30
कला, वाणिज्य आणि विज्ञान शाखेच्या पदवी प्रथम वर्ष प्रवेशासाठी महाविद्यालयांमध्ये विद्यार्थ्यांची गर्दी होत आहे. अभियांत्रिकीच्या प्रथम वर्षासाठी नाव नोंदणी आणि कागदपत्रांच्या तपासणीचा मंगळवारी अंतिम मुदत आहे.
कोल्हापूर : कला, वाणिज्य आणि विज्ञान शाखेच्या पदवी प्रथम वर्ष प्रवेशासाठी महाविद्यालयांमध्ये विद्यार्थ्यांची गर्दी होत आहे. अभियांत्रिकीच्या प्रथम वर्षासाठी नाव नोंदणी आणि कागदपत्रांच्या तपासणीचा मंगळवारी अंतिम मुदत आहे.
बारावीच्या मूळ गुणपत्रिकांचे वाटप दि. १२ जूनला झाले. त्याच्या दुसऱ्या दिवशीपासून शहरातील विवेकानंद महाविद्यालय, गोखले कॉलेज, महावीर महाविद्यालय, राजाराम महाविद्यालय, न्यू कॉलेज, राजर्षी छत्रपती शाहू कॉलेज, केएमसी कॉलेज, नाइट कॉलेज, शहाजी कॉलेज, कॉमर्स कॉलेज, कमला कॉलेज या महाविद्यालयांमध्ये पदवी प्रथम वर्षाची प्रवेश प्रक्रिया सुरू झाली. त्यातील विवेकानंद महाविद्यालय आणि गोखले कॉलेजकडून आॅनलाईन प्रक्रिया राबविली जात आहे.
आॅफलाईन पद्धतीने अर्ज वितरण आणि संकलन सुरू असलेल्या महाविद्यालयांत विद्यार्थ्यांची गर्दी होत आहे. अकरावीची प्रवेश प्रक्रिया प्रक्रिया सुरू होण्यापूर्वी प्रथम वर्षाची प्रक्रिया पूर्ण करण्याचे नियोजन वरिष्ठ महाविद्यालयांनी केली आहे. बहुतांश महाविद्यालयांतील प्रथम वर्षाचे वर्ग दि. १ जुलैपासून सुरू होणार आहेत.
‘आरटीई’अंतर्गत प्रवेशाची २५ जूनपर्यंत मुदत
बालकांचा मोफत व सक्तीच्या शिक्षणाचा हक्क अधिनियम २००९ अन्वये वंचित गटातील बालकांना व दुर्बल घटकातील बालकांना प्राथमिक शिक्षणासाठी प्रवेश प्रक्रियेची दुसरी फेरी पूर्ण झाली आहे. त्यात कोल्हापूर जिल्ह्यातील एकूण ३१८३ अर्ज मिळाले.
सदर विद्यार्थ्यांच्या प्रवेशासाठी घेतलेल्या दुसऱ्या प्रवेश फेरीतून ७२६ विद्यार्थ्यांनी शाळेमध्ये प्रवेश निश्चित केला. त्यांची यादीवरील लिंकवर अपलोड केली आहे, तरी पालकांनी सदरची प्रिंट व प्रवेशासंबंधीची सर्व कागदपत्रे घेऊन संबंधित शाळेत जावून पाल्याचा प्रवेश निश्चित करावा. त्यासाठीची अंतिम मुदत दि. २५ जूनपर्यंत आहे.