कोल्हापूर : आत्मविश्वासाची ‘चेतना’ जागृत करणारी संस्था : आयुक्त चौधरी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 24, 2018 04:49 PM2018-03-24T16:49:00+5:302018-03-24T16:49:00+5:30
चेतना विकास मंदिर ही फक्त ‘विशेष मुलांची शाळा’ नसून, त्या मुलांच्या विविध गुणांना वाव देऊन त्यांच्यातील आत्मविश्वासाची चेतना जागृत करण्याचे काम करणारे केंद्र आहे, असे प्रतिपादन आयुक्त डॉ. अभिजित चौधरी यांनी केले.
कोल्हापूर : चेतना विकास मंदिर ही फक्त ‘विशेष मुलांची शाळा’ नसून, त्या मुलांच्या विविध गुणांना वाव देऊन त्यांच्यातील आत्मविश्वासाची चेतना जागृत करण्याचे काम करणारे केंद्र आहे, असे प्रतिपादन आयुक्त डॉ. अभिजित चौधरी यांनी केले.
शेंडा पार्क येथील चेतना विकास मंदिरमध्ये शनिवारी वार्षिक पारितोषिक वितरण समारंभात प्रमुख पाहुणे म्हणून ते बोलत होते. याप्रसंगी क्रीडा स्पर्धांसह विविध स्पर्धांमध्ये यशस्वी झालेल्या विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला.
चौधरी म्हणाले, सामाजिक बांधीलकी ठेवत चेतना विकास मंदिरने अनेक मुलांना मुख्य प्रवाहात आणले आहे. त्याचसोबत येथील प्रत्येक मुलाला स्वावलंबी बनविले जाते, हा उपक्रम कौतुकास्पद आहे.
महानगरपालिकेच्या वतीने दिव्यांग मुलांसाठी अनेक योजना राबविल्या जातात. मात्र त्या योजनांची माहिती अजूनही सर्व स्तरांपर्यंत व्यवस्थित पोहोचलेली दिसत नाही. आरोग्य, शिष्यवृत्तीसारख्या योजनांचा यामध्ये समावेश आहे. त्या योजना आपल्या येथील मुलांसाठी मिळण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न केले जातील, अशी ग्वाही त्यांनी यावेळी दिली.
यावेळी आयुक्त चौधरी यांनी चेतना विकास मंदिरच्या विविध उपक्रमांची माहिती घेतली; तसेच विद्यार्थ्यांनी तयार केलेल्या वस्तूंची पाहणी केली. यावेळी क्रीडा स्पर्धांसह विविध शैक्षणिक उपक्रमांतील गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला.
यावेळी ‘स्पर्श जाणिवेतून मानवते’कडे या सामाजिक संस्थेचे असिम जमादार, सौरभ पाटील यांच्यासह सायबर येथील सामाजिकशास्त्र विभागातील विद्यार्थ्यांसह, संस्थेचे अध्यक्ष नरेश बगरे, सचिव दिलीप बापट, खजानिस श्रीराम भिसे, मुख्याध्यापिका संध्या इनामदार यांच्यासह विद्यार्थी, पालक उपस्थित होते.
प्रशांत कोठावळे यांनी सूत्रसंचालन केले; तर अनिल वागवेकर यांनी आभार मानले. याप्रसंगी संस्थेचे कार्याध्यक्ष पवन खेबुडकर यांनी प्रास्ताविक केले. उपाध्यक्ष डॉ. सुनील पाटील यांनी पाहुण्यांची परिचय करून दिला.