कोल्हापूर : अण्णाभाऊंना शाहिरी मुजरा, जोशाबा विचारमंच व शिव-शाहू पोवाडा मंचचे आयोजन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 1, 2018 01:55 PM2018-08-01T13:55:51+5:302018-08-01T13:59:07+5:30
साहित्यरत्न रणझुंजार लोकशाहीर अण्णाभाऊ साठेंच्या ९८ व्या जयंतीनिमित्त जोशाबा विचारमंच व शिव-शाहू पोवाडा मंचच्यावतीने ‘अण्णाभाऊंना शाहिरी मुजरा’ हा कार्यक्रम सादर करण्यात आला.
कोल्हापूर : साहित्यरत्न रणझुंजार लोकशाहीर अण्णाभाऊ साठेंच्या ९८ व्या जयंतीनिमित्त जोशाबा विचारमंच व शिव-शाहू पोवाडा मंचच्यावतीने ‘अण्णाभाऊंना शाहिरी मुजरा’ हा कार्यक्रम सादर करण्यात आला.
शाहू स्मारक भवनच्या मिनी हॉलमध्ये झालेल्या या कार्यक्रमास प्रमुख पाहूणे म्हणून शाहू छत्रपती व महापौर शोभा बोंद्रे उपस्थित होत्या. अध्यक्षस्थानी साहित्यिक एस. पी. कांबळे होते. यावेळी सामाजिक कार्यकर्ते दिनकर आवळे, गायक सम्यक विरवेकर, ‘माझा राजा शाहू राजा’ या पुस्तकाची लेखिका गायत्री शिंदे, शाहीर दिप्ती सावंत व तृप्ती सावंत यांचा विशेष सत्कार करण्यात आला.
यावेळी शाहू छत्रपती व महापौर शोभा बोंद्रे यांनी संस्थेच्यावतीने सुरू असलेल्या अण्णाभाऊ साठेंच्या विचारांच्या प्रसाराचे काम आदर्शवत व कौतुकास्पद असल्याचे मनोगत व्यक्त केले.
कार्यक्रमाची सुरुवात संजय गुरव यांनी ‘अण्णाभाऊंना माझा मानाचा मुजरा’ या शाहिरीने केली. शाहीर दिलीप सावंत यांनी ‘जग बदल घालुनी घाव’ तसेच ‘माझी मैना गावाकडं राहिली’ हे अण्णाभाऊंची प्रसिद्ध शाहिरी सादर केली.
शाहीर रंगराव पाटील यांनी राजर्षी शाहू महाराज, बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांचा जागर आपल्या शाहिरीतून केला. याशिवाय शाहीर युवराज पाटील, दिप्ती सावंत, तृप्ती सावंत, नुपूर वायदंडे, बालशाहीर सोनाली वायदंडे यांनी शाहिरी सादर केली. शाहीर विजय शिंदे यांनी स्वागत केले. तेजस्वीनी पांचाळ हिने सूत्रसंचालन केले.