कोल्हापूर : ‘गोकुळ’ सभेची मूळ याचिका कायम, दोन याचिका मात्र तूर्त फेटाळल्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 23, 2018 07:34 PM2018-04-23T19:34:14+5:302018-04-23T19:34:14+5:30
कोल्हापूर जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघाच्या (गोकुळ) वार्षिक सर्वसाधारण सभेबाबत अंबाई दूध संस्थेने दाखल केलेली मूळ याचिका अद्याप कायम आहे. उर्वरित दोन याचिका मात्र तूर्त फेटाळ्यात आल्या आहेत.
कोल्हापूर : कोल्हापूर जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघाच्या (गोकुळ) वार्षिक सर्वसाधारण सभेबाबत अंबाई दूध संस्थेने दाखल केलेली मूळ याचिका अद्याप कायम आहे. उर्वरित दोन याचिका मात्र तूर्त फेटाळ्यात आल्या आहेत.
‘गोकुळ’ दूध संघाची वार्षिक सर्वसाधारण सभा १५ सप्टेंबरला झाली. सभेच्या कामकाजावर आक्षेप घेत विरोधी आमदार सतेज पाटील यांच्या गटाने सहकार विभागाकडे याचिका दाखल केली होती. सहकार विभागाने सभेचे निर्णय न्यायालयीन पातळीवर असल्याचा निकाल दिल्यानंतर आमदार पाटील समर्थक अंबाई दूध संस्था, येवती (ता. करवीर) यांनी सहकार न्यायालयात याचिका दाखल केली.
दूध संघाच्या सत्तारूढ गटाने घेतलेली वार्षिक सभा बेकायदेशीर आहे. अवघ्या पाच मिनिटांत सभा गुंडाळून ज्यांचा संघाच्या व्यवस्थापनाशी संबध नाही, अशा व्यक्तीने प्रोसेडिंगचे वाचन केले. त्यामुळे ही सभा रद्द करावी, अशी मूळ याचिका दाखल केली.
त्याशिवाय १५ सप्टेंबरला झालेल्या सभेतील ठरावांची अंमलबजावणी करू नये व न्यायालयाच्या प्रतिनिधींच्या अध्यक्षतेखाली वार्षिक सभा पुन्हा घ्यावी, अशा पोट याचिका दाखल केल्या होत्या. त्यावर १८ एप्रिलला सहकार न्यायालयात सुनावणी झाली. यामध्ये मूळ याचिका कायम ठेवत पोट याचिका तूर्त फेटाळल्या आहेत. मूळ याचिकेवर २० जूनला सुनावणी होणार आहे.
‘गोकुळ’च्या सभेविरोधात आम्ही दाखल केलेल्या याचिकेपैकी मूळ याचिका कायम ठेवत पोट याचिका न्यायालयाने तूर्त फेटाळल्या आहेत; पण लाखो दूध उत्पादकांना निश्चित न्याय मिळेल.
- किरणसिंह पाटील.
अंबाई दूध संस्था-याचिकाकर्ते