कोल्हापुरचे चित्रकार जे बी सुतार यांचे निधन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 18, 2017 06:54 PM2017-10-18T18:54:38+5:302017-10-18T18:58:13+5:30
कोल्हापुरच्या अभिजात चित्र शैलीतील नामवंत ज्येष्ठ चित्रकार जनार्दन उर्फ जे. बी. सुतार (वय ६६) यांचे मंगळवारी मध्यरात्री निधन झाले. पंचगंगा स्मशानभूमी येथे त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले.
कोल्हापूर, दि. १८ : कोल्हापुरच्या अभिजात चित्र शैलीतील नामवंत ज्येष्ठ चित्रकार जनार्दन उर्फ जे. बी. सुतार (वय ६६) यांचे मंगळवारी मध्यरात्री निधन झाले. पंचगंगा स्मशानभूमी येथे त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले.
महिन्याभरापासून त्यांना पोटदुखीचा त्रास होता. अखेर मंगळवारी रात्री त्यांची प्राणज्योत मालवली. त्यांच्या पश्चात आई, पत्नी, मुलगा, सून व नातू असा परिवार आहे.जे. बी सुतार यांनी वयाच्या बाराव्या वर्षापासून हातात कुंचला घेतला आणि वास्तववादी शैलीत रंगरेषांद्वारे त्यांनी चित्र रेखाटन सुरू केले. सुरवातीच्या काळात त्यांनी साईन बोर्डची कामे केली.
मंदिरातील देव देवतांची चित्रे, गणेशोत्सवातील देखाव्याचे सेट, सिनेपोस्टर्स, कॅलेंडर्सवरही त्यांची चित्रे प्रसिद्ध झाली आहेत. पोट्रेटमध्येही त्यांचा हातखंडा होता. बाळासाहेब ठाकरे, मिनाताई ठाकरे, सचिन तेंडूलकर, नाना पाटेकर अशा अनेक नामवंत व्यक्तींचे त्यांनी पोट्रेट त्यांनी रेखाटले.
अत्यंत प्रतिकुल परिस्थितीतून त्यांनी वास्तववादी चित्रकार म्हणून स्वत:ची शैली निर्माण केली व कोल्हापुरच्या चित्र परंपरेत आपले बहुमोल योगदान दिले. त्यांच्या अंत्यसंस्कारास कोल्हापुरातील चित्रकार उपस्थित होते. रक्षाविसर्जन रविवारी (दि. २२) आहे.