कोल्हापूर पंचायत समितीतही कमळ फुलले!
By admin | Published: February 24, 2017 12:38 AM2017-02-24T00:38:39+5:302017-02-24T00:38:51+5:30
हातकणंगले ताब्यात : कागल, आजरा, राधानगरीत ‘घड्याळाचा गजर’; कॉँग्रेसला करवीर, गगनबावड्यातच यश
कोल्हापूर : जिल्ह्यातील बारा पंचायत समित्यांपैकी राधानगरी, आजरा, कागलमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे वर्चस्व राहिले आहे. करवीर, गगनबावडा काँग्रेसकडे कायम राहिला असून पन्हाळा, हातकणंगले जनसुराज्य-भाजपला सत्ता मिळाली आहे. शाहूवाडी पंचायत समिती शिवसेनेकडे, तर भुदरगड पंचायत समितीवर आमदार प्रकाश आबिटकर यांच्या शाहू आघाडीने सत्ता प्रस्थापित केली आहे. चंदगड, शिरोळ, गडहिंग्लजमध्ये सत्तेचे त्रांगडे निर्माण झाले.
सदस्यांचा विचार करायचा झाल्यास कॉँग्रेसला सर्वाधिक ३२ जागा मिळाल्या असल्या तरी मावळत्या सभागृहापेक्षा २१ जागा कमी झाल्या आहेत. मावळत्या सभागृहातील
बलाबल पाहिले तर काँग्रेसकडे सहा, राष्ट्रवादी काँग्रेसकडे तीन, जनसुराज्य-स्वाभिमानी व शिवसेना यांच्याकडे प्रत्येकी एक-एक अशा पंचायत समितींची सत्ता होती. सदस्यसंख्येचा विचार केल्यास १३८ पैकी तब्बल ५३ सदस्य काँग्रेसचे, तर ३६ राष्ट्रवादी काँग्रेसचे होते. शिवसेनेचे दहा, जनसुराज्य पक्षाचे १४ तर ‘स्वाभिमानी’चे १० सदस्य चिन्हावर निवडून आले होते. काँग्रेसकडे सर्वाधिक पंचायत समित्या व सदस्यसंख्या असली तरी गेल्या पाच वर्षांत बऱ्याच घडामोडी झाल्या आहेत गतनिवडणुकीत प्रा. संजय मंडलिक, संजय घाटगे, आमदार प्रकाश आबीटकर हे कॉँग्रेसमध्ये होते. त्यामुळे कागल व भुदरगड तालुक्यात काँग्रेसला ताकद मिळाली; पण आता परिस्थिती वेगळी असून करवीर व गगनबावड्यात कॉँग्रेसने सत्ता खेचली. राधानगरीत शिवसेनेला सोबत घेतले तरी पाच जागा होतात, पण सभापतिपदाचा अनुसूचित जातीचा उमेदवार हा राष्ट्रवादी कॉँग्रेसचा आल्याने येथे सत्ता राष्ट्रवादीचीच राहणार आहे.
राष्ट्रवादीने राधानगरी, कागल, आजरा पंचायत समिती ताब्यात घेतल्या असल्या तरी सदस्यसंख्या १२ ने कमी झाली आहे. शिवसेनेने शाहूवाडी तालुक्यातील सत्ता अबाधित राखली आहे. हातकणंगलेमध्ये भाजपचा पहिला सभापती होणार आहे. ‘स्वाभिमानी’ची एकमेव शिरोळची सद्दी संपुष्टात आली असून येथे सत्तेचे त्रांगडे निर्माण झाले आहे. येथे दोन्ही कॉँग्रेसला सहा, ‘स्वाभिमानी’ला चार तर शिवसेनेला दोन व भाजप, अपक्ष यांना प्रत्येकी एक जागा मिळाली आहे. त्यामुळे येथे दोन्ही काँग्रेस व स्वाभिमानी एकत्र येऊ शकते. गडहिग्लजमध्ये भाजप ३, राष्ट्रवादी, ताराराणी, काँग्रेस प्रत्येकी दोन तर स्वाभिमानी शेतकरी संघटनेला १ जागा मिळाली आहे. येथे भाजप, ताराराणी एकत्र येऊन ‘स्वाभिमानी’ला सोबत घ्यावे लागणार आहे.
सहा मतांनी विजय
अनेक ठिकाणी जिल्हा परिषद, पंचायत समितीच्या उमेदवारांना अतिशय कमी मतांनी विजय मिळाला आहे. नांदणीमधून भाजपचे राजवर्धन निंबाळकर हे केवळ सहा मतांनी विजयी झाले, तर उत्तूरमधून जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष उमेश आपटे हे केवळ ३० मतांनी विजयी झाले.
प्रचंड मतांच्या फरकाने विजय
जनसुराज्य पक्षाच्या मनिषा माने यांनी भादोले मतदारसंघातून तब्बल ७८३८ मतांनी विजय संपादन करून सर्वाधिक मताधिक्य घेतले आहे तर त्यापाठोपाठ काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष पी. एन. पाटील
यांचे चिरंजीव राहुल यांनी ७२२४ चे मताधिक्य घेऊन राष्ट्रवादीचे करवीर तालुकाध्यक्ष हंबीरराव पाटील यांचा पराभव केला.
नोटाबंदीचा परिणाम नाही
नरेंद्र मोदी यांनी ज्या पद्धतीने नोटाबंदीचा निर्णय घेतला होता, त्याविरोधात दोन्ही काँग्रेसने प्रचारादरम्यान रान उठविले होते. विशेषत: आमदार हसन मुश्रीफ आणि आमदार सतेज पाटील यांच्या भाषणामध्ये नोटा बंदीमुळे जनतेला त्रास सहन करावा लागत असल्याचा आरोप सातत्याने केला गेला. मात्र, मतदारांनी त्यांच्या या आरोपांचा फारसा विचार केला नसल्याचे निकालावरून दिसून आले.
भाजपचे चार जागांचे गणित चुकले
‘भाजप-ताराराणी’ने आपल्या विजयी उमेदवारांच्या यादीमध्ये अशोक चराटी (आजरा),पी. जी. शिंदे (गगनबावडा), संजय बडकडली (कडगाव), महावीर गाठ (रेंदाळ) ही नावे निश्चित धरली होती. या आधारावर भाजप-ताराराणीने गणितेही घातली होती. अतिशय प्रयत्नपूर्वक हे नियोजन केले होते. मात्र, हे चौघेही पराभूत झाल्याने पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांनाही रूखरूख लागून राहिली आहे.
कुणाला कुठे भोपळा
काँग्रेस- हातकणंगले, कागल, पन्हाळा आणि शाहूवाडी या चार तालुक्यांत काँग्रेसला ‘भोपळा’ही फोडता आला नाही. हातकणंगले येथे आवाडे गटाच्या दोन जागा आल्या आहेत तर गगनबावड्यात १०० टक्के यश मिळवले आहे.
राष्ट्रवादी काँग्रेस- हातकणंगले, चंदगड, करवीर व गगनबावडा तालुक्यात राष्ट्रवादीला ‘भोपळा’ही फोडता आलेला नाही. मात्र, चंदगडमध्ये कुपेकर गटाने दोन जागा मिळवल्या आहेत.
भाजप- आजरा, चंदगड, कागल, राधानगरी, भुदरगड, शाहूवाडी, गगनबावडा या सात तालुक्यांमध्ये भाजपला ‘भोपळा’ही फोडता आला नाही. आजऱ्यात ताकद असतानाही तेथे भाजपचा उमेदवार नव्हता.
शिवसेना- आजरा, गडहिंग्लज, चंदगड, भुदरगड, गगनबावडा या तालुक्यांमध्ये शिवसेनेला ‘भोपळा’ही फोडता आलेला नाही. आबिटकर यांनी भुदरगडमध्ये स्थानिक आघाडी केली होती.