त्रिपुरारी पौर्णिमेनिमित्त दिव्यांनी उजळला कोल्हापुरातील पंचगंगा घाट, रांगोळीतून सामाजिक संदेशाबरोबरच प्रचार
By इंदुमती सूर्यवंशी | Published: November 8, 2022 05:46 PM2022-11-08T17:46:20+5:302022-11-08T17:47:14+5:30
पहाटेच्या अंधारात लाखो दिव्यांच्या मंद प्रकाशात तेजाळलेला परिसर, सप्तरंगी रांगोळ्यांचा गालिचा, भक्तिगीतांचे सूर, फटाक्यांची आतषबाजी, त्यांना लेसर शोचीही साथ आणि हजारो कोल्हापूरकरांची उपस्थिती अशा जल्लोषात नदी घाटावर दीपोत्सव रंगला.
कोल्हापूर : त्रिपुरारी पौर्णिमेनिमित्त लाखो पणत्यांच्या तेजाने आज, मंगळवारी पंचगंगा नदीचा घाट उजळला. कोरोनाच्या दोन वर्षांच्या खंडानंतर पहाटेच्या अंधारात लाखो दिव्यांच्या मंद प्रकाशात तेजाळलेला परिसर, सप्तरंगी रांगोळ्यांचा गालिचा, भक्तिगीतांचे सूर, फटाक्यांची आतषबाजी, त्यांना लेसर शोचीही साथ आणि हजारो कोल्हापूरकरांची उपस्थिती अशा जल्लोषात नदी घाटावर दीपोत्सव रंगला.
गेल्या १५ दिवसांपासून सुरू असलेल्या दिवाळी या दीपोत्सवाची सांगता त्रिपुरारी पौर्णिमेला होते. या दिवशी सर्व मंदिरे व जलाशयांच्या ठिकाणी दिवे लावले जातात. तर कोल्हापूरचा ऐतिहासिक, पौराणिक आणि निसर्गाचा ठेवा असेलल्या पंचगंगा नदीघाटावर यादिवशी पहाटे दीपोत्सव साजरा होतो. कोरोनामुळे दोन वर्षे या उत्सवात खंड पडला. यंदा मात्र ही कसर भरून काढत कोल्हापूरकरांनी या दीपोत्सवाला मोठी गर्दी केली.
शिवमुद्रा प्रतिष्ठानच्या वतीने पहाटे चार वाजता पंचगंगेची आरती करून दीपोत्सवाला सुरुवात झाली. यावेळी भाजपा युवा मोर्चाचे उपाध्यक्ष संदीप देसाई, बाळासाहेबांची शिवसेना पक्षाचे उपशहरप्रमुख कपिल नाळे उपस्थित होते. त्यानंतर करण्यात आलेल्या फटाक्यांच्या भव्य आतषबाजीने आसमंत उजळला.
सामाजिक संदेश आणि प्रचारही
दीपोत्सवानिमित्त काढण्यात आलेल्या रांगोळीतून कोल्हापूर अर्बन बँक निवडणुकीचा प्रचार करण्यात आला. तसेच थुंकीमुक्त कोल्हापूर, लेक वाचवा, लव जिहादमध्ये ओढल्या गेलेल्या तरुणींना वाचवा, असे अनेक सामाजिक संदेश देण्यात आले.