कोल्हापूर : युवती आत्महत्येचा प्रयत्न केल्याप्रकरणी पंढरीनाथ पाटील निलंबित
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 26, 2018 06:35 PM2018-07-26T18:35:53+5:302018-07-26T18:40:35+5:30
केर्ले (ता. करवीर) येथील महाविद्यालयीन युवतीने विष प्राशन करून आत्महत्येचा प्रयत्न केल्याप्रकरणी संशयित प्रा. पंढरीनाथ पाटील याला गुरुवारी न्यायालयाने सोमवार (दि. ३०) पर्यंत पोलीस कोठडी दिली. प्रा. पाटील याच्यावर महाविद्यालयातून निलंबनाची कारवाई संबंधित शिक्षण संस्थेने केली आहे.
कोल्हापूर : केर्ले (ता. करवीर) येथील महाविद्यालयीन युवतीने विष प्राशन करून आत्महत्येचा प्रयत्न केल्याप्रकरणी संशयित प्रा. पंढरीनाथ पाटील याला गुरुवारी न्यायालयाने सोमवार (दि. ३०) पर्यंत पोलीस कोठडी दिली. प्रा. पाटील याच्यावर महाविद्यालयातून निलंबनाची कारवाई संबंधित शिक्षण संस्थेने केली आहे. दरम्यान, संबंधित युवतीवर खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. याचा तपास करवीर पोलीस करीत आहेत.
पोलिसांनी सांगितले की, दसरा चौक परिसरातील एका नामवंत महाविद्यालयात पंढरीनाथ पाटील हा प्राध्यापक आहे. याच महाविद्यालयात वाणिज्य विभागातील दुसऱ्या वर्गात संबंधित युवती शिक्षण घेते. संबंधित युवतीस या प्राध्यापकाने प्रेमाच्या जाळ्यात ओढून तिच्यावर अत्याचार केला.
ही युवती कळंबा तलाव येथे बुधवारी (दि. २५) गेली व तिने मोबाईलवरून पाटीलला फोन केला. यात दोघांत वाद झाला. या वादातून तिने विष प्राशन केले. हा प्रकार तिच्या नातेवाइकांना समजला. तिला तातडीने खासगी रुग्णालयात उपचारासाठी नेले. संशयित पाटील याला करवीर पोलिसांनी अटक केली.
गुरुवारी पोलीस निरीक्षक सुनील पाटील यांनी पंढरीनाथ पाटीलला न्यायालयात हजर केले. त्याला न्यायालयाने सोमवार (दि. ३०) पर्यंत पोलीस कोठडी दिली. याचा तपास पोलीस उपनिरीक्षक स्नेहा पाटील करीत आहेत.
दरम्यान, या प्रकरणाची माहिती समजल्यानंतर गुरुवारी सकाळी संबंधित महाविद्यालय संलग्न असलेल्या शिक्षण संस्थेच्या कार्यकारिणीने तातडीची बैठक घेतली. त्यात प्रा. पाटील याला निलंबित करण्याचा निर्णय घेण्यात आला.
याबाबतचे पत्र संस्थेने जिल्हा परिषदेचे माध्यमिक शिक्षणाधिकारी किरण लोहार यांना दिले, अशी माहिती संबंधित महाविद्यालयाचे प्राचार्य यांनी दिली. पंढरीनाथ पाटील हा गेल्या सात वर्षांपासून महाविद्यालयात कनिष्ठ विभागात सेवा बजावत होता. सुरुवातीला शिक्षणसेवक म्हणून त्याने तीन वर्षे काम केले. त्यानंतर तो प्राध्यापक म्हणून सेवेत रुजू झाला.