कोल्हापूर : परशुराम, बसवेश्वर, शिवराय पालखी उत्साहात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 19, 2018 07:05 PM2018-04-19T19:05:20+5:302018-04-19T19:05:20+5:30
अखिल भारतीय ब्राह्मण महासंघ, चित्पावन संघ यांच्यावतीने भगवान परशुराम, महात्मा बसवेश्वर आणि छत्रपती शिवाजी महाराज जयंतीनिमित्त बुधवारी पालखी सोहळा उत्साहात संपन्न झाला.
कोल्हापूर : अखिल भारतीय ब्राह्मण महासंघ, चित्पावन संघ यांच्यावतीने भगवान परशुराम, महात्मा बसवेश्वर आणि छत्रपती शिवाजी महाराज जयंतीनिमित्त बुधवारी पालखी सोहळा उत्साहात संपन्न झाला.
बिनखांबी गणेश मंदिर परिसरातील गुरू महाराज वाडा येथून सायंकाळी पालखी सोहळ्यास सुरुवात झाली. पालखीच्या अग्रभागी हरिभक्तपरायण व्यास यांचे कीर्तन होते. त्यापाठोपाठ फुलांनी सजविलेल्या पालखीमध्ये भगवान परशुराम, महात्मा बसवेश्वर आणि छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमा ठेवण्यात आल्या होत्या.
पालखी मार्गावर महिलांनी पारंपरिक टिपरी नृत्यही केले. ही पालखी महाद्वार रोड, जोतिबा रोड, अंबाबाई मंदिर परिसरातून गुरू महाराज वाडा येथे पोहोचली. जागोजागी पालखीचे स्वागत आरतीने औक्षण करून करण्यात येत होते.
दरम्यान, बुधवारी सकाळी परशुराम जयंतीनिमित्त चित्पावन संघातर्फे संस्थेच्या कार्यालयात विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. त्यामध्ये महाअभिषेक, दुपारी भजन-कीर्तन आदी कार्यक्रम झाले तर ब्राह्मण महासंघातर्फे सकाळी कात्यायनी येथील परशुराम मंदिरात ‘श्रीं’चे पूजन करण्यात आले. आकर्षक फुलांनी सजविलेल्या पालखीमध्ये भगवान परशुराम, महात्मा बसवेश्वर आणि छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमा ठेवण्यात आल्या होत्या.
या सोहळ्याला नंदकुमार मराठे, वसंत मुतालिक, डॉ. उदय कुलकर्णी, शाम जोशी, द. गो. कानिटकर, प्रसाद कुलकर्णी, देविदास सबनीस, सी. जी. कुलकर्णी, संगीता आपटे यांच्यासह नागरिक उपस्थित होते.