कोल्हापूर : शाळा बंद ठेवून मोर्चात सहभागी व्हा, चार हजार शाळांना पत्र
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 20, 2018 07:03 PM2018-03-20T19:03:46+5:302018-03-20T19:03:46+5:30
शिक्षण वाचवा नागरिक कृती समितीच्यावतीने शुक्रवारी (दि. २३) गांधी मैदान ते जिल्हाधिकारी कार्यालय अशा काढण्यात येणाऱ्या मोर्चात शाळा बंद ठेवून मोठ्या संख्येने सहभागी होण्याचे आवाहन करणारी सुमारे चार हजार पत्रे कोल्हापूर जिल्हा माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळा मुख्याध्यापक संघातर्फे जिल्ह्यातील विविध शाळांना पाठविण्यात आली आहेत, अशी माहिती समितीचे समन्वयक गिरीष फोंडे यांनी दिली.
कोल्हापूर : शिक्षण वाचवा नागरिक कृती समितीच्यावतीने शुक्रवारी (दि. २३) गांधी मैदान ते जिल्हाधिकारी कार्यालय अशा काढण्यात येणाऱ्या मोर्चात शाळा बंद ठेवून मोठ्या संख्येने सहभागी होण्याचे आवाहन करणारी सुमारे चार हजार पत्रे कोल्हापूर जिल्हा माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळा मुख्याध्यापक संघातर्फे जिल्ह्यातील विविध शाळांना पाठविण्यात आली आहेत,अशी माहिती समितीचे समन्वयक गिरीष फोंडे यांनी दिली.
राज्यातील कमी पटसंख्या असलेल्या शाळा बंद करू नयेत, कॉर्पोरेट कंपन्यांना शाळा सुरू करण्यास परवानगी देऊ नये, या प्रमुख मागण्यांसाठी हा मोर्चा काढण्यात येणार आहे. गांधी मैदान येथून सकाळी दहा वाजता निघणाऱ्या मोर्चात शहरासह जिल्ह्यातील सर्व प्राथमिक, माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळा सहभागी होणार आहेत.
खरी कॉर्नर, मिरजकर तिकटी, दसरा चौक, व्हीनस कॉर्नर, जिल्हाधिकारी कार्यालय, असा मोर्चाचा मार्ग असणार आहे. गांधी मैदान येथे सकाळी विविध संघटनांचे पदाधिकारी मार्गदर्शन करणार आहेत तर जिल्हाधिकारी कार्यालय येथे मोर्चाचे नेतृत्व करणारे ज्येष्ठ विचारवंत प्रा. एन. डी. पाटील हे मार्गदर्शन करतील. शुक्रवारी (दि.२३) भगतसिंग, राजगुरू, सुखदेव यांचा शहीद दिन आहे. त्यामुळे त्यांची वेशभूषा परिधान करून अनेक विद्यार्थी या मोर्चात सहभागी होणार आहेत.
शहरातील पाच संघटना होणार स्वयंसेवक
मोर्चात पन्नास हजारांहून अधिक विद्यार्थी, पालक, शिक्षक, संस्थाचालक, नागरिक सहभागी होणार आहेत. इतक्या मोठ्या संख्येने लोक रस्त्यावर उतरणार आहेत. त्यांची कोणतीही गैरसोय होऊ नये, यासाठी शहरातील पाच शिक्षक संघटना स्वयंसेवकांची भूमिका बजाविणार आहेत. त्यामध्ये खासगी शिक्षक महासंघ, खासगी शिक्षक समिती, मनपा शिक्षक समिती, मनपा शिक्षक संघ, मनपा शिक्षक पुरोगामी संघटनेचा समावेश असेल, अशी माहिती संतोष आयरे यांनी दिली.
विद्यार्थ्यांचे नुकसान होऊ देणार नाही
शाळा बंद ठेवून शिक्षक मोर्चात सहभागी होणार आहेत. त्यामुळे जादा वेळ देऊन शुक्रवारी होणारे शैक्षणिक नुकसान शिक्षकांच्यावतीने भरून काढण्यात येणार आहे. त्यामुळे कोणत्याही विद्यार्थ्याचे या मोर्चामुळे नुकसान होणार नाही, असे शैक्षणिक व्यासपीठातर्फे सांगण्यात आले.