कोल्हापूर :टाळ-मृदंगाच्या गजरात उत्तरेश्वर पेठ दिंडी सोहळा, पंढरपूरकडे प्रस्थान
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 16, 2018 11:55 AM2018-07-16T11:55:08+5:302018-07-16T12:00:37+5:30
कोल्हापुरातील उत्तरेश्वर पेठ विठ्ठल मंदिरामधील २८ वी आषाढी वारी पायी दिंडी पंढरपूरकडे प्रस्थान झाली. यावेळी हरिभक्तांसह नागरिकांनी गर्दी केली होती.
कोल्हापूर : टाळ-मृदंगाचा जल्लोष... खांद्यावर डौलणारी भगवी पताका! अभंगाच्या मधुर स्वरांच्या तालावर दंग झालेले हरिभक्त! आषाढातील पावसाच्या सरी झेलत ‘मनी पांडुरंगाच्या भेटीची लागली ओढ ! राम कृष्ण हरी’चा नामघोष अशा रम्य वातावरणात कोल्हापुरातील उत्तरेश्वर पेठ विठ्ठल मंदिरामधील २८ वी आषाढी वारी पायी दिंडी पंढरपूरकडे प्रस्थान झाली. यावेळी हरिभक्तांसह नागरिकांनी गर्दी केली होती.
कोल्हापुरातील उत्तरेश्वर दिंडी सोहळ्याला वारकऱ्यांसह नागरिकांनी उत्तरेश्वर पेठ मार्गावर गर्दी केली होती. (छाया : दीपक जाधव)
या दिंडी सोहळ्याचे ‘लोकमत’चे वरिष्ठ सरव्यवस्थापक मकरंद देशमुख, आर. डी. पाटील, पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समितीचे अध्यक्ष महेश जाधव, माजी नगरसेवक प्रकाश गवंडी, दिंडीचालक ह. भ. प. ज्ञानदेव ऊर्फ नाना पाटील, लक्ष्मीपुरी पोलीस ठाण्याचे निरीक्षक वसंत बाबर, आदींच्या उपस्थितीत श्रीफळ वाढवून उद्घाटन झाले. उत्तरेश्वर पेठ विठ्ठल मंदिर व आनंदी महाराज मठतर्फे दिंडीचे आयोजन करण्यात आले होते.
तत्पूर्वी, विठ्ठल मंदिरात पहाटे पाच वाजता अभिषेक सोहळा, महापूजा, काकड आरती झाली व पंचपदी, भजन झाले. महादेव मंदिर येथे आरतीनंतर हा पायी दिंडी सोहळा शुक्रवार पेठ, महापालिका, लक्ष्मीपुरीमार्गे मार्केट यार्ड, शिरोली पुलाची, हातकणंगलेमार्गे पंढरपूरकडे मार्गस्थ झाला. या सोहळ्यात कसबा बावडा, आसुर्ले-पोर्ले, बोलोली, राशिवडे, आदी गावांतील वारकऱ्यांचा सहभाग होता.
गुरुवर्य तात्यासाहेब वासकर यांचा कृपाशीर्वाद आणि कोल्हापूर जिल्हा वारकरी संप्रदायप्रणित या आषाढी वारी पायी दिंडी सोहळ्याचे आयोजन दरवर्षी केले जाते. यावेळी नगरसेविका माधवी गवंडी, गजानन चव्हाण, बाळासाहेब पाटील, अप्पासाहेब मोरे, स्वानंद जाधव, रोहन जाधव, अरुण नाझरे, श्रीधर एतावडेकर, नंदकुमार राऊत, संदीप तळसकर, संजय सुतार, गणपतराव चौगले, विजय एतावडेकर, चोपदार दिलीप माडेकर, संजय यादव, मुरलीधर एतावडेकर, चंद्रकांत काकडे, पांडुरंग माळवदे, परशराम घाटगे, अनिल राबाडे, आदी उपस्थित होते.
असा राहणार मार्ग
हातकणंगले, जयसिंगपूर, मिरज, शिरढोण, खुर्ची नागज, जुनौनी, पाचेगाव, वाटबरे, सांगोलामार्गे शनिवारी (दि. २१) पंढरपूर येथील विठ्ठल मंदिर येथे.
नव्या पिढीने वारकरी संप्रदायाकडे वळले पाहिजे. भक्तीतील आनंद लुटणे गरजेचे आहे.
- ह.भ.प. ज्ञानदेव ऊर्फ नाना पाटील,
दिंडीचालक