कोल्हापूर : मतदान नसल्याने रखडला ११ वर्षे रस्ता, व्यावसायिकांसह प्रवाशांना त्रास
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 24, 2018 12:00 PM2018-12-24T12:00:47+5:302018-12-24T12:05:11+5:30
कोल्हापूर मध्यवर्ती बसस्थानक परिसर म्हणजे दिवस-रात्र प्रवाशांची ये-जा, दिवसभर नागरिकांची गर्दी असे वातावरण आहे. रिक्षाथांब्याच्या पाठीमागे असलेल्या या मार्गावर मोठमोठे खड्डे, ड्रेनेजचे झाकण वर आल्याने छोटे-मोठे अपघात हे नित्याचेच बनले आहे.
कोल्हापूर : मध्यवर्ती बसस्थानक परिसर म्हणजे दिवस-रात्र प्रवाशांची ये-जा, दिवसभर नागरिकांची गर्दी असे वातावरण आहे. रिक्षाथांब्याच्या पाठीमागे असलेल्या या मार्गावर मोठमोठे खड्डे, ड्रेनेजचे झाकण वर आल्याने छोटे-मोठे अपघात हे नित्याचेच बनले आहे.
सातत्याने येथील व्यावसायिकांनी महापालिकेच्या प्रशासनाकडे रस्त्याच्या दुर्दशाबद्दल व्यथा मांडून निवेदन दिले. या ठिकाणचे मतदान नसल्याने हा रस्ता रखडला असल्याच्या संतप्त प्रतिक्रिया व्यावसायिकांमधून उमटत आहेत.
मध्यवर्ती बसस्थानक परिसरात दोनशेच्या वर व्यावसायिक आहेत.
वाहनधारकांनाही या रस्त्यावरून जाताना कसरत करीत जावे लागते.(छाया : नसीर अत्तार)
महाराजा हॉटेल ते स्नानगृहापर्यंतच्या रस्त्यात अक्षरश: खड्डेच खड्डे आहेत. त्यातून वाहन चालविताना कसरत करावी लागते. त्याचबरोबर पादचाऱ्यांनाही याचा त्रास होतो. रस्ता खराब असल्याने धुळीच्या कणांचा परिणाम येथील व्यावसायिकांवर होत आहे. गेल्या ११ वर्षांहून अधिक काळ हा रस्ता खराब आहे. विशेषत: पावसाळ्यात तर रस्त्याला बकाल स्वरूप येते. यामधूनच पर्यटक, प्रवासी व नागरिकांना पायपीट करावी लागते. त्यामुळे पर्यटक, प्रवासी यांच्याकडूनही नाराजी व्यक्त होत आहे.
रस्त्यावर ड्रेनेजचे झाकण आल्याने रोज छोटे-मोठे अपघात नित्याचेच ठरले आहेत. त्यामुळे नवीन डांबरीकरण करावे, अशी व्यावसायिकांमधून मागणी होत आहे.(छाया : नसीर अत्तार)
रस्त्यावर ड्रेनेजचे झाकण आल्याने रोज या ठिकाणी छोटे-मोठे अपघात हे ठरलेले आहेत. महापालिकेचे कर आम्ही भरतो; पण आम्हाला सुविधा दिल्या पाहिजेत, अशी व्यावसायिकांमधून मागणी होत आहे. याप्रश्नी खासदार धनंजय महाडिक यांनाही सहा महिन्यांपूर्वी निवेदन दिले आहे. हे सर्व करूनही अद्याप रस्त्याचे नवीन डांबरीकरण झालेले नाही. ते लवकर व्हावे, अशी व्यावसायिकांमधून मागणी होत आहे.
अनेक वर्षे हा रस्ता खराब झाला आहे. सातत्याने रस्त्याप्रश्नी व्यथा मांडल्या. मात्र अद्याप या रस्त्यामधूनच आजही प्रवास करावा लागतो आहे.
-रघू माने,
सलून व्यावसायिक, सीबीएस, कोल्हापूर.
रस्ता आणि ड्रेनेज झाकण्यामुळे रोज अपघात होता. याचा त्रास नागरिक, पर्यटक व प्रवाशांना होतो आहे. तसेच धुळीच्या कणांमुळे आरोग्यावर परिणाम होत आहे.
- राजेश चौयथानी,
चप्पल व्यावसायिक
हा रस्ता माझ्या शिवाजी पार्क प्रभागात येतो. या रस्त्याची टेंडर प्रक्रिया सुरू असून लवकरच वर्क आॅर्डर निघेल. जानेवारीअखेर नवीन रस्ता होईल.
- आशिष ढवळे,
स्थायी सभापती, कोल्हापूर महापालिका.