आपत्तीमुळे ‘कोल्हापूर पॅटर्न’चा उदय : कलशेट्टी : प्लास्टिकमुक्त शहर करण्याचा निर्धार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 17, 2019 10:12 AM2019-09-17T10:12:19+5:302019-09-17T10:15:50+5:30
राज्याच्या आपत्ती व्यवस्थापनात ‘कोल्हापूर पॅटर्न’चा उदय झाला. इतके चांगले काम कोल्हापूरकरांनी केले, असे गौरवोद्गार महानगरपालिका आयुक्त डॉ. मल्लिनाथ कलशेट्टी यांनी येथे बोलताना केले.
कोल्हापूर : अतिवृष्टी आणि महापुराच्या संकटावर मात करण्याकरीता शासकीय, निमशासकीय तसेच शहरातील विविध स्वयंसेवी संस्था, संघटना, कार्यकर्त्यांनी दाखविलेले धैर्य आणि केलेली मदत यामुळे राज्याच्या आपत्ती व्यवस्थापनात ‘कोल्हापूर पॅटर्न’चा उदय झाला. इतके चांगले काम कोल्हापूरकरांनी केले, असे गौरवोद्गार महानगरपालिका आयुक्त डॉ. मल्लिनाथ कलशेट्टी यांनी येथे बोलताना केले.
आॅगस्ट महिन्यात निर्माण झालेल्या महापुराच्या परिस्थितीत विशेष कामगीरी बजावलेल्या महानगरपालिका अधिकारी, कर्मचारी, शहरातील विविध स्वयंसेवी संस्था, संघटना, पदाधिकारी, कार्यकर्ते या सर्वांबद्दल आयोजित केलेल्या कृतज्ञता सोहळ्यात आयुक्त कलशेट्टी बोलत होते. केशवराव भोसले नाट्यगृहात झालेल्या सोहळ्याच्या अध्यक्षस्थानी महापौर माधवी गवंडी होत्या. सोहळ्यात कोल्हापूर शहराला प्लास्टिकमुक्त करण्याचा निर्धार करण्यात आला.
महापुरामध्ये सापडलेल्या आपल्या सहकाऱ्यांचा बचाव करण्यासह त्यांना मदत करण्यात घेतलेला पुढाकार अभूतपूर्व होता. कोणत्याही संकटावेळी धावून जाण्याची कोल्हापूरकरांच्या वृत्तीचे यानिमित्ताने दर्शन झाले. महापुराच्या काळात प्रत्येकाने काम केले म्हणूनच लवकर संकटातून बाहेर पडलो. त्याचे श्रेय कोल्हापूरकरांचेच आहे. आता ज्यांचे नुकसान झाले त्यांना पुन्हा नव्याने उभे करण्याकरीता आपणास प्रयत्न करायचे आहेत, असे आयुक्त म्हणाले.
भविष्यात अशी पूरपरिस्थिती निर्माण होणार नाही यासाठी आपण सर्वांनीच खबरदारी घेणे आवश्यक आहे. प्रत्येक शहरवासीयाने मी प्लास्टिक वापरणार नाही, असा निर्धार करून प्लास्टिकमुक्त शहर करण्याची जबाबदारी स्वीकारावी, असे आवाहनही त्यांनी केले. यावेळी आयुक्तांनी प्लास्टिकमुक्त शहर व स्वच्छ सुंदर शहर यासंदर्भात सर्वांना शपथ दिली.
जेथे शासन पोहोचले नाही तेथे कोल्हापूर पोहोचले, याचा सार्थ अभिमान आम्हाला नक्कीच आहे, असे सांगून उपमहापौर भूपाल शेटे यांनी सांगितले की, यापूर्वी आयुक्तांचे कौतुक करण्याचा कधीही प्रसंग आला नाही. मात्र, आज डॉ. कलशेट्टी यांचे संपूर्ण शहरवासीय कौतुक करतात. त्यांनी केलेले काम अतिशय चांगले होते, म्हणूनच संकटातून लवकर बाहेर पडलो. पृथ्वी हे शेषनारायणाच्या फण्यावर तरलेली नाही तर ती समाजातील सेवाभावी वृत्तीच्या लोकांमुळे तरली आहे.
कारवाईत हस्तक्षेप नाही : देशमुख
आयुक्तांनी शहर प्लास्टिकमुक्त करण्याचा निर्धार केला आहे. या उपक्रमास साथ म्हणून आम्हीही आजच निर्धार करतोय की ज्या-ज्या विक्रेत्यांवर प्लास्टिक विरोधी कारवाई म्हणून पाच हजाराचा दंड होईल त्यावेळी आम्हा नगरसेवकांचा हस्तक्षेप असणार नाही, असे स्थायी सभापती शारंगधर देशमुख म्हणाले.
पाच हजाराचा बोनस द्या : शेटे
महापालिका आरोग्य विभागातील कर्मचाऱ्यांनी महापुरात तसेच महापुरानंतर स्वच्छतेचे काम अत्यंत चांगल्या पद्धतीने केले आहे. त्यामुळे त्यांच्या कामाचे कौतुक करायचे असेल तर त्यांना प्रत्येकी पाच हजार रुपये बोनस द्यावा, अशी सूचना उपमहापौर शेटे यांनी केली.
कायमचे पुनर्वसन : आयुक्त
गेल्या अनेक वर्षांपासून महापूर आला की बाधित होणाऱ्या सुतारवाडा, लक्ष्मीपुरी परिसरातील लोकांचे कायमस्वरूपी पुनर्वसन करण्याचा आमचा प्रयत्न आहे. ज्यांचे पुनर्वसन करणे आवश्यक आहे, अशांना प्रधानमंत्री आवास योजनेतून घरे बांधून देण्याचा आराखडा तयार करत आहोत, असे आयुक्त कलशेट्टी यांनी सांगितले.