राज्याच्या रेशन व्यवस्थेत आता ‘कोल्हापूर पॅटर्न’ : गिरीश बापट
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 1, 2018 01:23 AM2018-07-01T01:23:06+5:302018-07-01T01:24:08+5:30
बायोमेट्रिक प्रणालीद्वारे रेशन व्यवस्थेमध्ये कोल्हापूर जिल्ह्याने केलेले काम दिशादर्शक आहे. त्यामुळे शिक्षणातील लातूर पॅटर्नप्रमाणे राज्यात रेशन व्यवस्थेमध्ये आता ‘कोल्हापूर पॅटर्न’ राबविला जाईल,
कोल्हापूर : बायोमेट्रिक प्रणालीद्वारे रेशन व्यवस्थेमध्ये कोल्हापूर जिल्ह्याने केलेले काम दिशादर्शक आहे. त्यामुळे शिक्षणातील लातूर पॅटर्नप्रमाणे राज्यात रेशन व्यवस्थेमध्ये आता ‘कोल्हापूर पॅटर्न’ राबविला जाईल, अशी घोषणा अन्न व नागरी पुरवठा मंत्री गिरीश बापट यांनी शनिवारी येथे केली. शासकीय वसतिगृहातील गरीब विद्यार्थ्यांना व वृद्धाश्रमातील वृद्धांना रेशनवर दोन रुपये किलो दराने गहू व तीन रुपये किलो दराने तांदूळ देण्याचे सरकारच्या विचाराधीन असल्याचेही त्यांनी जाहीर केले.
कोल्हापूर जिल्हा रास्त भाव धान्य दुकानदार संघटनेतर्फे कसबा बावडा रोडवरील महासैनिक दरबार हॉल येथे राज्यस्तरीय सन्मान मेळावा व ‘एईपीडीएस’ प्रणाली कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी ते प्रमुख पाहुणे म्हणून बोलत होते. प्रमुख उपस्थिती पश्चिम महाराष्ट देवस्थान समितीचे अध्यक्ष महेश जाधव, आॅल इंडिया फेअर प्राईस शॉप डीलर्स फेडरेशनचे जनरल सेक्रेटरी विश्वंभर बसूू, कार्याध्यक्ष चंद्रकांत यादव, महाराष्ट राज्य स्वस्त धान्य दुकानदार महासंघाचे अध्यक्ष डी. एन. पाटील, राज्य संघ सल्लागार मंडळाचे उपाध्यक्ष राजेश आंबूसकर, कोल्हापूर जिल्हा रास्त भाव धान्य दुकानदार संघटनेचे शहराध्यक्ष रवींद्र मोेरे, भाजप महानगर अध्यक्ष संदीप देसाई, पुणे विभागीय उपायुक्त (पुरवठा) नीलिमा धायगुडे, जिल्हाधिकारी अविनाश सुभेदार, जिल्हा पुरवठा अधिकारी विवेक आगवणे यांची होती.
मंत्री बापट म्हणाले, रेशन दुकानदारांच्या मागण्यांबाबत सरकार सकारात्मक असून टप्प्याटप्प्याने त्या मार्गी लावल्या जातील. त्याचबरोबर रेशन दुकानदार हा मालक असल्याने त्याला पगाराऐवजी उत्पन्नानुसार मानधनात वाढ करून त्याला सक्षम केले जाणार आहे. त्यासाठी केंद्रीय मंत्रालयाकडे प्रस्ताव पाठविण्यात आला आहे.
विश्वंभर बसू यांनी राज्यातील रेशन दुकानदारांचे कमिशन वाढवून देण्याची मागणी मंत्री बापट यांच्याकडे केली. डी. एन. पाटील यांनी रेशन दुकानदारांना सरकारने प्रतिक्विंटल १५० ऐवजी २५० रुपये कमिशन द्यावे, दुकानदाराला जागेचे भाडे द्यावे व माथाडी कामगार कायद्यानुसार दुकानातील अकुशल कामगाराला वेतन द्यावे अशा मागण्या केल्या.
चंद्रकांत यादव यांनी रेशनवर १४ वस्तू विक्री करण्याची परवानगी मिळावी, तसेच जिल्ह्यासाठी स्वतंत्र ‘पीडीएस’ भवन बांधण्याची मागणीही त्यांनी केली. महेश जाधव यांनी बायोमेट्रिक प्रणालीमुळे काळाबाजार थांबला असून, पारदर्शक कारभार होत असल्याचे सांगितले. जिल्हाधिकारी सुभेदार यांनी प्रशासन व रेशन दुकानदार यांनी एकत्र काम केल्याने जिल्हा राज्यात अव्वल आल्याचे सांगितले. विवेक आगवणे यांनी बायोमेट्रिक रेशनमधील कोल्हापूरच्या वाटचालीविषयीची माहिती दिली.
विवेक आगवणे यांचे कौतुक
बायोमेट्रिक रेशनिंग प्रणालीमध्ये राज्यात कोल्हापूर जिल्हा क्रमांक एकवर कायम ठेवल्याबद्दल मंत्री बापट यांनी भाषणात जिल्हा पुरवठा अधिकारी विवेक आगवणे यांच्या पाठीवर कौतुकाची थाप दिली. आजच्या कार्यक्रमात मला जेवढ्या टाळ्या मिळाल्या नाहीत, त्याच्या दुप्पट टाळ्या या आगवणे यांंना मिळाल्या असून, यावरून त्यांच्या कामातील प्रामाणिकपणा लक्षात येत असल्याचे गौरवोद्गार काढून आगवणे बहुतेक ‘आमदार’ होणार अशी कोटीही त्यांनी केली.
‘बायोमेट्रिक’मुळे ३०० टन धान्याची बचत
बायोमेट्रिक रेशनिंग प्रणालीमुळे कोल्हापूर जिल्ह्याचे वर्षाला सुमारे ३०० टन धान्य वाचल्याने जवळपास १० कोटी रुपये शिल्लक राहिले आहेत. तर रॉकेलमधून दोन ते तीन कोटी रुपये शिल्लक राहिले आहेत. राज्यातही तीन लाख ८० हजार मेट्रिक टन धान्याची बचत झाल्याने सुमारे दोन हजार कोटी रुपये शिल्लक राहिले आहेत. त्यामुळे या शिल्लक पैशातून दुकानदारांचे कमिशन वाढविण्यासाठी केंद्र सरकारला विनंती केल्याचे मंत्री बापट यांनी सांगितले.
तालुक्यांचा गौरव
बायोमेट्रिक रेशनिंगमध्ये ‘एईपीडीएस’प्रणालीद्वारे
९० टक्क्याच्या पुढे धान्याचे वितरण केल्याबद्दल कोल्हापूर शहर, इचलकरंजी शहरासह आजरा, कागल, भुदरगड, राधानगरी, पन्हाळा, गगनबावडा, गडहिंग्लज, करवीर, हातकणंगले, चंदगड, शाहूवाडी या तालुक्यांचे रेशन दुकानदार व संबंधित तहसीलदारांचा प्रशस्तिपत्र देऊन मंत्री बापट यांच्या हस्ते गौरव करण्यात आला.