कोल्हापूर : प्राथमिक शाळांसाठी १९ कोटींचा लोकसहभाग : अंबरीश घाटगे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 7, 2018 11:47 AM2018-11-07T11:47:36+5:302018-11-07T11:49:00+5:30
गेल्या दीड वर्षांमध्ये लोकसहभागातून १९ कोटी रुपयांचा शैक्षणिक उठाव करण्यात आल्याची माहिती जिल्हा परिषदेच्या शिक्षण समितीचे सभापती अंबरीश घाटगे यांनी पत्रकार परिषदेत दिली. डॉ. जे. पी. नाईक ‘माझी शाळा, समृद्ध शाळा’ उपक्रमाला मुदतवाढ देण्याची माहिती देण्यासाठी बोलावलेल्या पत्रकार परिषदेत त्यांनी ही माहिती दिली. या उपक्रमाला ३१ डिसेंबरपर्यंत मुदतवाढ दिली आहे आणि १५ जानेवारीला जिल्हास्तरीय मूल्यमापन होणार आहे.
कोल्हापूर : गेल्या दीड वर्षांमध्ये लोकसहभागातून १९ कोटी रुपयांचा शैक्षणिक उठाव करण्यात आल्याची माहिती जिल्हा परिषदेच्या शिक्षण समितीचे सभापती अंबरीश घाटगे यांनी पत्रकार परिषदेत दिली. डॉ. जे. पी. नाईक ‘माझी शाळा, समृद्ध शाळा’ उपक्रमाला मुदतवाढ देण्याची माहिती देण्यासाठी बोलावलेल्या पत्रकार परिषदेत त्यांनी ही माहिती दिली. या उपक्रमाला ३१ डिसेंबरपर्यंत मुदतवाढ दिली आहे आणि १५ जानेवारीला जिल्हास्तरीय मूल्यमापन होणार आहे.
घाटगे म्हणाले, बाराही तालुक्यांमध्ये या उपक्रमाबाबत कार्यशाळा घेतल्या. सर्वत्र चांगला प्रतिसाद मिळत असून, गेल्या आर्थिक वर्षात १९ कोटी आणि गेल्या सहा महिन्यांत ३ कोटी रुपयांचा लोकसहभाग मिळाला आहे. यंदाच्या आर्थिक वर्षात २0 कोटी रुपयांचा लोकसहभाग मिळविण्याचे उद्दिष्ट आहे.
मुख्य कार्यकारी अधिकारी अमन मित्तल यांनी ग्रामपंचायतींना शिक्षणावर २५ टक्के खर्च करणे बंधनकारक असल्याचे सांगून त्यानुसार आराखडे बदलून देण्यास सांगितले आहे. याची योग्य अंमलबजावणी झाली, तर शाळांचा चांगला विकास होईल. ९७ शाळा डिजिटल होणे बाकी असून, प्रत्येक शाळेत स्वच्छतागृहे आहेत, मात्र त्यांची अवस्था चांगली नाही. त्यामुळे प्रत्येक ठिकाणी मुलामुलींसाठी प्रत्येकी एक चांगले स्वच्छतागृह असावे, असा प्रयत्न आहे.
प्रत्येक शाळेमध्ये ३0 हजार रुपये खर्चून प्रयोगशाळा तयार करण्याचाही संकल्प आम्ही केला असून, शाळा खोल्या निर्लेखनाची गरज आहे त्याच ठिकाणी परवानगी दिल्याचे घाटगे यांनी सांगितले.
गतवर्षी शाळा दुरुस्तीसाठी पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी ८ कोटी रुपयांचा निधी दिला असून, त्यातून २४0 शाळांची दुरुस्ती केली जाणार आहे. जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा शौमिका महाडिक, स्थानिक स्वराज्य संस्थांचे पदाधिकारी आणि ग्रामस्थ, अधिकाऱ्यांचे याकामी सहकार्य लाभल्याचे घाटगे यांनी सांगितले.