कोल्हापूरकर मंडलिक, मानेंना चितपट केल्याशिवाय स्वस्थ बसणार नाहीत - सुषमा अंधारे

By ऑनलाइन लोकमत | Published: November 17, 2022 04:38 PM2022-11-17T16:38:32+5:302022-11-17T16:39:00+5:30

पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांचे काही चुकले होते तर बिंदू चौकात जाहीर सभा घेऊन जाब विचारायला हवा होता.

Kolhapur People MP Sanjay Mandlik will defeat Dhairyasheel Mane says Sushma Andhare | कोल्हापूरकर मंडलिक, मानेंना चितपट केल्याशिवाय स्वस्थ बसणार नाहीत - सुषमा अंधारे

कोल्हापूरकर मंडलिक, मानेंना चितपट केल्याशिवाय स्वस्थ बसणार नाहीत - सुषमा अंधारे

googlenewsNext

कोल्हापूर : पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांचे काही चुकले होते तर बिंदू चौकात जाहीर सभा घेऊन जाब विचारायला हवा होता. संजय मंडलिक, धैर्यशील माने यांना कोल्हापूरच्या जनतेने संधी दिली, मात्र ते कपटनीतीने पळून गेले. हा कोल्हापूरचा लाल मातीचा आखाडा आहे, येथील जनता दोघांनाही चितपट केल्याशिवाय स्वस्थ बसणार नाही, असा विश्वास शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या उपनेत्या सुषमा अंधारे यांनी महाप्रबोधन यात्रेच्या मेळाव्यात व्यक्त केला.

शिवसेना उपनेत्या संजना घाळी म्हणाल्या, हिंदुत्वाची वल्गना करणाऱ्यांनी महाराष्ट्राला दिल्ली व गुजरातच्या दावणीला बांधण्याचे पाप केले. हेच बाळासाहेब ठाकरे यांचे विचार होते का? शिवसेना संपविण्याचा कुटिल डाव उधळून लावत ‘धनुष्यबाण’ टिकवण्यासाठी गावोगावी जाऊन प्रतिज्ञापत्रे घ्यावीत.

शिवसेनेचे जिल्हाप्रमुख संजय पवार म्हणाले, ज्यांची लायकी नव्हती, त्यांना पदे देऊन आमदार केले, मात्र तेच पक्ष सोडून पळून गेले. त्यांनी केलेली पापे झाकण्यासाठीच सत्तेच्या आसऱ्याला गेले. मात्र, करवीर निवासिनी अंबाबाईची नगरी आहे, तिच्या कोर्टात कोणाचीही सुटका नाही, असा इशारा राजेश क्षीरसागर यांचे नाव न घेता दिला. आम्हाला पक्षाकडून काहीच मिळाले नाही, असे काही मंडळी म्हणत आहेत. आता, मंत्री पदासाठी क्लेम असल्याचे ते सांगत आहेत. या मंडळींचा त्याग किती? हे कोल्हापूरकरांनी ‘जयप्रभा’ व देवस्थानच्या साडी प्रकरणात बघितला आहे. खासदार संजय राऊत व विनायक राऊत यांच्या पायावर लोटांगण घालणारे आता त्यांच्यावर टीका करत आहेत, अशा प्रवृत्तीला नियती कधी माफ करणार नाही.

शहरप्रमुख रविकिरण इंगवले, तानाजी आंग्रे, अवधूत साळोखे, शुभांगी पोवार, प्रज्ञा उत्तुरे, कमलाकर जगदाळे, मंजीत माने यांनी मनोगत व्यक्त केले. माजी आमदार सुरेश साळोखे, विजय देवणे, बाजीराव पाटील, पोपट दांगट, नियाज खान, आदी उपस्थित होते.

लाव रे ते व्हिडीओ....

सुषमा अंधारे यांनी भाषणाची सुरुवात करण्यापूर्वीच दसरा मेळाव्यातील व्हिडीओ दाखवत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर हल्ला चढवला.

शहरातील रस्त्यांवरील खर्चांचा हिशेब मांडणार

गेल्या दहा-पंधरा वर्षांत कोल्हापूर शहरात शासनाच्या विविध निधीतून रस्त्यांवर झालेल्या खर्चाचा हिशेब महापालिका व बांधकाम विभागाकडे मागणार आहे. अनेक ठिकाणी बेकायदेशीरपणे खर्च टाकला असून, यासाठी अधिकाऱ्यांना सोडणार नाही, असा इशारा संजय पवार यांनी दिला.

आता नवरेही पळवत आहेत

शिवसेनेचे बाप स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पळवले. त्यानंतर स्वर्गीय ठाकरे यांच्या नोकराला आणि आता नवऱ्यांनाही (वैजनाथ वाघमारे यांना) पळवत आहेत, अशी टीका संजना घाळी यांनी केली.

Web Title: Kolhapur People MP Sanjay Mandlik will defeat Dhairyasheel Mane says Sushma Andhare

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.