कोल्हापूर : दोन महिन्यांच्या तुलनेत पेट्रोल १३.३०, तर डिझेल ९.५३ रु. कमी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 3, 2018 12:22 PM2018-12-03T12:22:34+5:302018-12-03T12:24:30+5:30
इंधन दरवाढ झाली की सर्वसामान्यांचे बजेट कोलमडते. आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत डॉलरच्या तुलनेत रुपया मजबूत झाल्याने दोन महिन्यांच्या तुलनेत पेट्रोलचा प्रतिलिटर दर रु. १३.३० ने, तर डिझेलचा दर रु. ९.५३ ने कमी झाला आहे. त्यामुळे सर्वसामान्यांना महागाईतही दिलासा मिळाला आहे.
कोल्हापूर : इंधन दरवाढ झाली की सर्वसामान्यांचे बजेट कोलमडते. आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत डॉलरच्या तुलनेत रुपया मजबूत झाल्याने दोन महिन्यांच्या तुलनेत पेट्रोलचा प्रतिलिटर दर रु. १३.३० ने, तर डिझेलचा दर रु. ९.५३ ने कमी झाला आहे. त्यामुळे सर्वसामान्यांना महागाईतही दिलासा मिळाला आहे.
पेट्रोल तर सर्वसामान्यांचा जिव्हाळ्याचा विषय ठरले आहे. कारण प्रत्येकाकडे दुचाकी असते. त्यात पेट्रोल भरले तरच ती चालते, तर डिझेल ही बाब मालवाहतुकीशी संबंधित आहे. धान्य, भाजीपाला, आदी वस्तू आणण्यासाठी मालवाहतूक करणाऱ्या वाहनांना डिझेल लागते. त्यामुळे तसे बघता दोन्ही इंधन सर्वसामान्यांच्या जिव्हाळ्याचेच विषय आहेत. त्यात आंतरराष्ट्रीय बाजारात डॉलरच्या तुलनेत रुपया मजबूत झाला आहे.
याचा फायदा होऊन संपूर्ण डिसेंबर महिन्यात इंधन दर कमीच राहतील, असा कयास पेट्रोल डिलरांकडून व्यक्त होत आहे. त्यामुळे पेट्रोल कंपन्यांनी दोन महिन्यांनी का होईना जनतेला दिलासा दिला आहे.
दोनच महिन्यांपूर्वी अर्थात २ आॅक्टोबर रोजी पेट्रोल ९१ रुपये २२ पैसे, तर डिझेल ७८ रुपये ७२ पैसे इतके होते. रविवारी (दि. २) हेच दर पेट्रोल ७७ रुपये ९२ पैसे, तर डिझेल ६९ रुपये ५३ पैसे इतके आहेत. त्यात पेट्रोल १३ रुपये ३० पैसे, तर डिझेल ९ रुपये ५३ पैशांनी कमी झाले आहेत. आज, सोमवारी पेट्रोल ७७ रु. ६३ पैसे, तर डिझेल ६८ रु. ८५ पैसे असे दर राहणार आहेत.
आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत डॉलरच्या तुलनेत रुपया मजबूत झाला आहे. यासह दरही कमी झाले आहेत. त्यामुळे पेट्रोल व डिझेलचे दर कमी झाले आहेत. त्यात राज्य सरकारने जर कर कमी केले तर आणखी दर कमी येतील. संपूर्ण डिसेंबर महिन्यात दर कमीच राहतील असा अंदाज आहे.
- गजकुमार माणगावे,
अध्यक्ष, कोल्हापूर जिल्हा पेट्रोल, डिझेल डिलर असोसिएशन