कोल्हापूर : सैनिकांसाठीच्या योजना गतीने राबवणार-संजय शिंदे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 27, 2018 11:34 AM2018-09-27T11:34:00+5:302018-09-27T11:44:43+5:30
गिरगाव हे सैनिकांचे गाव म्हणून ओळखले जात असून या गावातील आजी-माजी सैनिक व त्यांच्या कुटुंबीयांसाठी असणाऱ्या शासनाच्या विविध योजना अधिक गतीने राबविल्या जातील
कोल्हापूर : गिरगाव हे सैनिकांचे गाव म्हणून ओळखले जात असून या गावातील आजी-माजी सैनिक व त्यांच्या कुटुंबीयांसाठी असणाऱ्या शासनाच्या विविध योजना अधिक गतीने राबविल्या जातील, अशी ग्वाही निवासी उपजिल्हाधिकारी संजय शिंदे यांनी दिली.
‘स्वच्छता ही सेवा’ उपक्रमाचा प्रारंभ शिंदे यांच्या हस्ते करण्यात आला, त्याप्रसंगी ते बोलत होते. समारंभास जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी मेजर सुभाष सासने, गटविकास अधिकारी सचिन घाटगे, सरपंच संध्या पाटील, पोलीस निरीक्षक सुनील पाटील, सहाय्यक पोलीस निरीक्षक तृप्ती देशमुख, उपसरपंच प्रल्हाद जाधव उपस्थित होते.
जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी मेजर सुभाष सासने म्हणाले, करवीर तालुक्यातील गिरगाव या गावामध्ये आजी सैनिक, माजी सैनिक, युद्ध विधवा व माजी सैनिक विधवा पत्नी यांची संख्या जास्त असल्याने व सैनिकांचे गाव असे लौकिकास असल्याने या गावाची स्वच्छता अभियानसाठी निवड करण्यात आली आहे.
सरपंच संध्या पाटील याप्रसंगी बोलताना म्हणाल्या, सैनिकांचे गाव म्हणून लौकिक असलेल्या गिरगावात ३०० हून अधिक आजी-माजी सैनिक आहेत. याप्रसंगी आजी-माजी सैनिक संघटनेचे अध्यक्ष रघुनाथ पाटील यांनी आपले मनोगत व्यक्त केले.