कोल्हापूर : हास्यात बुडाल्या सखी, ‘आधी बसू ...’ नाटकास उत्स्फूर्त प्रतिसाद
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 14, 2018 07:02 PM2018-08-14T19:02:31+5:302018-08-14T19:08:31+5:30
लग्न झाल्यानंतर पती-पत्नीमध्ये विसंवाद होण्याच्या अनेक शक्यता निर्माण होतात, तरीही संवादाने प्रश्न सुटू शकतात, हे हसत-खेळत सांगणाऱ्या ‘आधी बसू, मग बोलू’ या नाटकाला सखींनी उत्स्फूर्त अशी दाद दिली.
कोल्हापूर : लग्न झाल्यानंतर पती-पत्नीमध्ये विसंवाद होण्याच्या अनेक शक्यता निर्माण होतात, तरीही संवादाने प्रश्न सुटू शकतात, हे हसत-खेळत सांगणाऱ्या ‘आधी बसू, मग बोलू’ या नाटकाला सखींनी उत्स्फूर्त अशी दाद दिली.
‘लोकमत’ सखी मंचच्या सभासदांसाठी आयोजित विद्यासागर अध्यापक लिखित, धनंजय पाटील दिग्दर्शित ‘आधी बसू ...’ या नाटकाचा प्रयोग सोमवारी (दि. १३) केशवराव भोसले नाट्यगृहात संध्याकाळी साडेचार वाजता संपन्न झाला.
प्रत्येक संवादाला उडणारे हास्याचे तुषार आणि संवादाला मिळणारी दाद जणू कलाकारांना सखींची पोहोचपावतीच देऊन गेली. राज्यसेवा व लोकसेवा आयोगाच्या परीक्षांसाठी विद्यार्थ्यांना यशाचा मार्ग दाखविणारे युनिक अकॅडमी कार्यक्रमाचे प्रायोजक होते.
सुरुवातीला युनिक अकॅडमीचे संचालक प्रा. शशीकांत बोराळकर, मनीषा बोराळकर यांच्या हस्ते दीपप्रज्वलन करून कार्यक्रमाचे उद्घाटन करण्यात आले. लोकमत सखी मंचच्या संयोजन समिती सदस्यांच्या हस्ते प्रा. बोराळकर यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात आले. यावेळी मनोगत व्यक्त करताना प्रा. बोराळकर म्हणाले, ‘यशाचा मार्ग हा कष्टप्रद असतो. योग्य मार्गदर्शन मिळाल्यास विद्यार्थी यशस्वी होऊ शकतो.’
विनोदी अंगाने संसाराचे सार सांगणारे नाटक नाट्यरंगच्या कलाकारांनी लीलया पेलले. यामध्ये महेश भूतकर (रमेश), केतकी पाटील (स्मिता), विद्या डांगे (अनघा), राजा बांबुळकर (विनायक ), गायत्री महाजन (विशाखा) आणि धनंजय पाटील (अजय) कलाकारांनी आपल्या उत्तम अभिनयाने सखींना रिझवले. यासाठी प्रकाशयोजना (कपील मुळे), संगीत (उमेश नेरकर), नेपथ्य (मिलिंद अष्टेकर), पार्श्वसंगीत ( हृषीकेश जोशी), आदींचे साहाय्य लाभले.
सखी मंचसाठी युनिकची सवलत
लोकमत सखी मंच सभासद व त्यांच्या कुटुंबीयांना स्पर्धापरीक्षेच्या तयारीसाठी ‘युनिक अकॅडमी’ मध्ये प्रवेश घ्यायचा असल्यास शुल्कात २५ टक्के सवलत देण्याच्या कार्यक्रमात संचालक प्रा. शशीकांत बोराळकर यांनी जाहीर केले.