कोल्हापूर : अफवा पसरविणाऱ्यांवर पोलिसांची करडी नजर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 3, 2018 01:17 PM2018-07-03T13:17:04+5:302018-07-03T13:18:48+5:30
सोशल मीडियावर अनोळखी व्यक्तींचे किंवा महिलांचे फोटो टाकून हे मुले पळविणाऱ्या टोळीतील आहेत, अशी अफवा पसरवून समाजात भीती निर्माण करणाऱ्या समाजकंटकांवर पोलिसांची करडी नजर आहे. चुकीच्या संदेशांमुळे निष्पापांचेही बळी जाऊ शकतात; त्यामुळे असे संदेश व्हॉट्स अॅपवरून पसरवू नयेत व अफवांवर जिल्ह्यातील नागरिकांनी विश्वास ठेऊ नये, असे आवाहन अप्पर पोलीस अधीक्षक तिरूपती काकडे यांनी केले आहे.
कोल्हापूर : सोशल मीडियावर अनोळखी व्यक्तींचे किंवा महिलांचे फोटो टाकून हे मुले पळविणाऱ्या टोळीतील आहेत, अशी अफवा पसरवून समाजात भीती निर्माण करणाऱ्या समाजकंटकांवर पोलिसांची करडी नजर आहे. चुकीच्या संदेशांमुळे निष्पापांचेही बळी जाऊ शकतात; त्यामुळे असे संदेश व्हॉट्स अॅपवरून पसरवू नयेत व अफवांवर जिल्ह्यातील नागरिकांनी विश्वास ठेऊ नये, असे आवाहन अप्पर पोलीस अधीक्षक तिरूपती काकडे यांनी केले आहे.
सोशल मीडियाच्या माध्यमातून मुले चोरणारी टोळी आपल्या भागात आहे. अफवांमुळे काही जिल्ह्यांत जमावांकडून बहुरूपी, वाटसरू, भिकारी व अन्य निष्पाप लोकांना जबर मारहाणीचे प्रकार घडले आहेत. काही घटनांत खून झाले आहेत. अशा अफवांवर विश्वास ठेवू नका, अशी काही माहिती मिळाल्यास तत्काळ जवळच्या पोलीस ठाण्याशी संपर्क साधावा. जर कोणी अशा प्रकारची अफवा पसरवीत असेल तर त्याचे नाव पोलिसांना कळवा.
खात्री केल्याशिवाय सोशल मीडियावर असला कोणताही मेसेज अन्य ठिकाणी टाकू नये. अफवा पसरविणाऱ्या तुमच्या प्रत्येक पोस्टवर पोलिसांचे लक्ष आहे. अशा व्यक्तीला कोणी सहकार्य केल्यास त्याच्यावर कडक कारवाई केली जाईल. जिल्ह्यातील नागरिकांनी कायदा व सुव्यवस्था अबाधित राहण्यासाठी पोलिसांना सहकार्य करावे, असे आवाहन अप्पर पोलीस अधीक्षक काकडे यांनी केले आहे.