Kolhapur- पोलिसांनी वेशांतर करून सराईत चोरट्या महिलेस केली अटक, दोन गुन्ह्यांची उकल
By ऑनलाइन लोकमत | Published: July 7, 2023 02:17 PM2023-07-07T14:17:53+5:302023-07-07T14:18:24+5:30
कोल्हापूर : शाहूपुरी पोलिसांनी मध्यवर्ती बसस्थानक परिसरात वेशांतर करून सराईत चोरट्या महिलेस पकडले. अनघा अनंत जोशी (वय ६२, मूळ ...
कोल्हापूर : शाहूपुरी पोलिसांनी मध्यवर्ती बसस्थानक परिसरात वेशांतर करून सराईत चोरट्या महिलेस पकडले. अनघा अनंत जोशी (वय ६२, मूळ रा. शिवाजीनगर, रत्नागिरी, सध्या रा. जाधववाडी, कोल्हापूर) असे अटकेतील महिलेचे नाव आहे. तिच्याकडून कोल्हापूर बसस्थानक आणि कराड बसस्थानकातील चोरीच्या दोन गुन्ह्यांची उकल झाली.
पोलिस निरीक्षक अजयकुमार सिंदकर यांनी दिलेल्या माहितीनुसार, मध्यवर्ती बसस्थानक परिसरात १ मे २०२३ रोजी वैशाली यल्लाप्पा कोटगी (सध्या रा. रोहा, जि. रायगड, मूळ रा. गडहिंग्लज) या महिलेच्या गळ्यातील सव्वा तोळे सोन्याची चेन चोरट्याने लंपास केली होती. तो गुन्हा सराईत चोरटी महिला अनघा जोशी हिने केल्याची माहिती कॉन्स्टेबल मिलिंद बांगर, शुभम संकपाळ आणि लखनसिंह पाटील यांना मिळाली. १ जुलैच्या दुपारी ती मध्यवर्ती बसस्थानक परिसरात येणार असल्याचे समजताच उपनिरीक्षक श्वेता पाटील यांच्यासह पथकाने वेशांतर करून मध्यवर्ती बसस्थानक परिसरात सापळा रचून जोशी हिला अटक केली.
अधिक चौकशीत तिच्याकडून कोल्हापूर मध्यवर्ती बसस्थानकातील चेन चोरीसह कराड बसस्थानकातून एका महिलेच्या गळ्यातील सोन्याचे दागिने चोरल्याचा गुन्हा उघड झाला. पोलिसांनी तिच्याकडून सोन्याची चेन आणि माळ असा सुमारे अडीच तोळ्यांचा दोन लाख ३० हजार रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त केला. आठ दिवसांच्या पोलिस कोठडीनंतर तिचा ताबा कराड पोलिसांकडे देण्यात आला.
तीन जिल्ह्यात गुन्हे
कोल्हापूर, सांगली, सातारा आणि रत्नागिरी जिल्ह्यात दहा ठिकाणी महिलांच्या गळ्यातील दागिने चोरीचे गुन्हे तिने केले आहेत. सांगली शहरातील गुन्ह्याचा तपास करताना पोलिसांना तिच्या रत्नागिरीतील घरात साडेसहा लाखांचे दागिने व रोकड मिळाली होती.