कोल्हापूर पोलिसांकडून आरोपींची पाठराखण
By admin | Published: May 31, 2016 01:15 AM2016-05-31T01:15:03+5:302016-05-31T01:19:26+5:30
विदेशी सहल फसवणूक : गुन्हा दाखल होऊनही निरीक्षकांचेच अज्ञान
कोल्हापूर : विदेशी सहल प्रकरणात जुना राजवाडा पोलिसांकडून तक्रारदारासच आरोपींच्या पिंजऱ्यात उभे करून आरोपीची मात्र पाठराखण सुरू असल्याचा अनुभव संबंधितांना येत आहे. याप्रकरणी राजश्री राजकुमार गाडगीळ यांनी बुधवारी (दि. २५) सायंकाळी पावणेपाच वाजता एफआयआर नोंदविला आहे; परंतु त्याची शनिवार (दि. २८) रात्रीपर्यंतही पोलिस निरीक्षक अनिल देशमुख यांना काहीच माहीत नव्हती. असा कोणताही गुन्हा पोलिस ठाण्यात दाखल नसल्याचे त्यांनी पत्रकारांना सांगितले होते.
घडले ते असे : कोल्हापूर व बेळगांवचे प्रत्येकी चौघे, ठाणे व पुण्यातील प्रत्येकी दोघे अशा बारा जणांनी कोल्हापुरातील राज टुर्स अॅन्ड ट्रॅव्हल्समार्फत युरोप दौऱ्याचे बुकिंग केले. राज टुर्सने मुंबईतील बांद्रा परिसरातील वर्ल्ड वाईड डीएमसी या ट्रॅव्हल्स कंपनीमार्फत या विदेश दौऱ्याची नोंदणी केली. त्यासाठी त्यांनी कल्लाप्पाण्णा आवाडे इचलकरंजी जनता बँकेच्या एक लाख रुपयांचा धनादेश २१ एप्रिलला दिला.
दुसरा धनादेश १७ लाख ६३ हजार ४८० रुपयांचा १७ मे रोजी दिला. १९९९ युरो डॉलर्स हा या दौऱ्याचा खर्च होता. त्यानुसार पैसे भरल्यानंतर त्यापुढील सगळी व्यवस्था वर्ल्ड वाईड टुर्स कंपनीने करायला हवी होती; परंतु त्यांच्या भोंगळ कारभाराचा फटका पर्यटकांना बसला. ही टूर दि. १७ मे ते ५ जून अशी आहे. मुळात ती दि. १३ मे रोजी जाणार होती परंतु व्हिसा उशिरा सबमिट केल्यामुळे ती लांबणीवर पडली.
वर्ल्ड वाईड कंपनीने प्रवाशांना त्यांची व्हौचर्सही घाईघाईत विमानतळावर जाताना टॅक्सीमध्ये दिली तेथूनच त्यांच्या गैरसोयीची सुरुवात झाली. प्रत्यक्षात युरोपमध्ये पोहोचल्यावर टोल-टॅक्सचे पैसे भरा, अशी मागणी केली. झुरिकला पोहोचल्यावर त्यांच्याकडे तब्बल ९ लाख रुपयांची मागणी केल्यावर या पर्यटकांच्या पायाखालची जमीनच सरकली. एवढे पैसे आम्ही येथे कोठून आणणार, अशी विचारणा त्यांनी केली.
पैसे द्या नाही तर आम्हाला पुढची सर्व्हिस देता येणार नाही, असे सांगू लागल्यावर त्यांनी ही माहिती राज टूर्सच्या संचालकांना सांगितली. त्यानुसार राजश्री गाडगीळ यांनी जुना राजवाडा पोलिसांत वर्ल्ड वाईड डीएमसी कंपनीच्या जिग्ना पटेल यांच्या विरोधात लेखी तक्रार दिली. त्यानुसार संशयित जिग्ना पटेल यांच्यासह त्यांच्या कार्यालयातील कर्मचाऱ्यांनाही पोलिसांनी ताब्यात घेऊन कोल्हापुरात आणले. त्यांना त्यांच्या वातानुकुलित वाहनांतून आणण्यात आले.
‘सरकारचे जावई’ असल्यासारखी वागणूक देण्यात आल्याची तक्रार गाडगीळ यांच्याकडून करण्यात आली. त्यावर तपास अधिकारी ए. व्ही. म्हस्के यांनी त्यांनाच ‘आम्हाला अक्कल शिकवू नका, तपास कसा करायचा हे आम्हास समजते,’ असे बजावले.
या प्रकरणात एवढ्या घडामोडी झाल्या असतानाही त्यावर पडदा टाकण्याचा पोलिसांचा प्रयत्न सुरू असल्याचे समजते. या प्रकरणी पोलिस निरीक्षक अनिल देशमुख यांना शनिवारीच (२८ मे) पत्रकारांनी विचारले असता त्यांनी अशी कोणताही घटना पोलिसांत नोंद नसल्याचे सांगून टाकले. गंमत म्हणजे म्हणजे त्यांनीच २५ मे रोजी राजश्री गाडगीळ यांचा अर्ज पोलिसांत दाखल (आ. क्रमांक १७०३/२०१५) करून घेतला आहे.
आता याप्रकरणी संबंधित पर्यटक दि. ५ जूनला कोल्हापुरात आल्यावरच जाबजबाब घेऊ, असे तपास अधिकारी फौजदार ए. व्ही. म्हस्के सोमवारी सांगत होते. तोपर्यंत सायंकाळी त्यांची राजारामपुरी पोलिस ठाण्यात बदली झाली. (प्रतिनिधी)
सहल अर्धवट सोडून आज भारताकडे प्रयाण
दरम्यान, हे पर्यटक सोमवारी पॅरिसमध्ये होते. हॉटेलमध्ये राहण्याची सोय सोडून त्यांच्या सर्व सुविधा बंद करण्यात आल्या होत्या. इथे उपाशीपोटी राहण्यापेक्षा मुंबईला परत गेलेले बरे या मानसिकतेत हे पर्यटक आले होते. राज गाडगीळ यांच्याकडे त्यांनी तसा आग्रह धरला. अखेर सहल अर्धवट सोडून हे पर्यटक आज, मंगळवारी विमानाने मायदेशी प्रयाण करणार असल्याचे त्यातील एका पर्यटकाने ‘लोकमत’ला सांगितले. उद्या, बुधवारी ते मुंबईत पोहोचतील, असेही या पर्यटकाने सांगितले.