कोल्हापूरच्या पोलीस आयुक्तालयास ठेंगा, पिंपरी-चिंचवडला मुखमंत्र्यांनी दिली मान्यता
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 10, 2018 06:22 PM2018-04-10T18:22:42+5:302018-04-10T18:22:42+5:30
कोल्हापुरात पोलीस आयुक्तालय होणार अशी हवा तयार केल्यानंतर अचानकपणे घूमजाव करीत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पिंपरी-चिंचवड येथे पोलीस आयुक्तालय निर्माण करण्यासह त्यासाठी येणाऱ्या खर्चास मान्यता देऊन कोल्हापूरला ठेंगा दाखविला. मंगळवारी मंत्रिमंडळाच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला.
कोल्हापूर : कोल्हापुरात पोलीस आयुक्तालय होणार अशी हवा तयार केल्यानंतर अचानकपणे घूमजाव करीत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पिंपरी-चिंचवड येथे पोलीस आयुक्तालय निर्माण करण्यासह त्यासाठी येणाऱ्या खर्चास मान्यता देऊन कोल्हापूरला ठेंगा दाखविला. मंगळवारी मंत्रिमंडळाच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. याद्वारे कोल्हापूरवासीयांच्या तोंडाला पाने पुसली गेल्यामुळे निराशा पसरली आहे.
गुन्हेगारीवर अंकुश ठेवण्यासाठी राज्यात तीन नवीन पोलीस आयुक्तालयांची स्थापना करण्यात येणार असल्याची घोषणा गृहराज्यमंत्री रणजित पाटील यांनी केली होती. त्यामध्ये कोल्हापूरसह पिंपरी-चिंचवड व मीरा-भार्इंदर या ठिकाणी पोलीस आयुक्तालये स्थापन करण्याच्या प्रस्तावावर राज्य शासन विचाराधीन असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
राज्य शासनाने नुकतेच अकोला येथे पोलीस आयुक्तालय केले आहे. कोल्हापूर पोलीस प्रशासन गेली २० वर्षे पोलीस आयुक्तालय होण्यासाठी राज्य शासनाकडे सातत्याने पाठपुरावा करीत आहे. विधानसभेत मुख्यमंत्री फडणवीस यांनी कोल्हापुरात पोलीस आयुक्तालय होणार असे आश्वासन दिले होते. त्यामुळे कोल्हापूरवासीयांच्या अशा पल्लवित झाल्या होत्या.
मंगळवारी मुंबई येथे झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत मुख्यमंत्री फडणवीस यांनी पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तालय स्थापन करण्यासह त्यासाठी येणाऱ्या खर्चास मान्यता दिली.
नवीन २ हजार ६३३ पदे निर्माण करणार असल्याचेही स्पष्ट केले. त्यामुळे मुख्यमंत्री फडणवीस यांनी गेल्या वीस वर्षांपासून पाठपुरावा करणाऱ्या कोल्हापूरला पोलीस आयुक्तालयाबाबत ठेंगा दाखविला. शासनाच्या या निर्णयाबद्दल कोल्हापूरवासीयांतून तीव्र नाराजी व्यक्त केली जात आहे.