कोल्हापूर पोलिसांनी सुरु केली ‘आरोपी दत्तक योजना’, सराईत १५२६ आरोपींवर राहणार करडी नजर
By उद्धव गोडसे | Updated: February 5, 2025 19:23 IST2025-02-05T19:07:16+5:302025-02-05T19:23:10+5:30
आरोपींची कुंडली तयार

कोल्हापूर पोलिसांनी सुरु केली ‘आरोपी दत्तक योजना’, सराईत १५२६ आरोपींवर राहणार करडी नजर
उद्धव गोडसे
कोल्हापूर : सराईत गुन्हेगारांवर नियंत्रण ठेवून गुन्हेगारी कमी करण्यासाठी पोलिस अधीक्षक महेंद्र पंडित यांनी ‘आरोपी दत्तक योजना’ सुरू केली आहे. या योजनेंतर्गत जिल्ह्यातील १५२६ आरोपींची जबाबदारी ६४३ पोलिसांकडे दिली आहे. यातून आरोपी आणि पोलिसांचा नियमित संपर्क राहणार असून, सराईतांना गुन्हेगारीच्या विळख्यातून बाहेर पडण्यास मदत होणार आहे.
गुन्हे घडल्यानंतर त्यांचा तपास करणे, दोषींना पकडणे, त्यांना शिक्षेपर्यंत पोहोचवणे हे काम पोलिसांना करावे लागतेच. मात्र, गुन्हे वाढू नयेत यासाठीही खबरदारी घ्यावी लागते. अन्यथा कायदा सुव्यवस्था बिघडते. रेकॉर्डवरील सराईत गुन्हेगार पुन्हा गुन्हे करून दहशत माजवतात. यातून गुन्हेगारी टोळ्यांची निर्मिती होते. परिणामी गुन्ह्याचे प्रमाण वाढते. याला आळा घालण्यासाठी पोलिस अधीक्षक पंडित यांनी गुन्हे आढावा बैठकीत आरोपी दत्तक योजनेची संकल्पना मांडली होती. त्यानुसार गेल्या आठवड्यापासून याची सुरुवात झाली.
जिल्ह्यातील ६३ अधिकारी आणि ५८० अंमलदारांकडे १५२६ आरोपींची जबाबदारी दिली आहे. आरोपीची संपूर्ण माहिती घेण्यापासून त्याच्या हालचालींवर नजर ठेवणे, त्याला गुन्ह्यांपासून परावृत्त करणे, प्रबोधन करण्याचे काम पोलिसांकडून केले जाणार आहे. यातून गुन्हे कमी होतील. शिवाय आरोपींना सुधारण्याची संधीही मिळेल, असा विश्वास अधीक्षक पंडित यांनी व्यक्त केला.
आरोपींची कुंडली तयार
दत्तक योजनेतून पोलिसांनी आरोपींची कुंडली तयार केली आहे. त्याचे नाव, पत्ता, मोबाइल नंबर, व्यवसाय, नातेवाईक, मित्र, आधीच्या गुन्ह्यातील न्यायालयीन कामकाजाची स्थिती, गुन्ह्याची पद्धत.. अशी सविस्तर माहिती पोलिसांनी घेतली आहे. यासाठी प्रत्येक पोलिस ठाण्यात स्वतंत्र रजिस्टर असून, त्यात भेटींचा तपशील नोंदवावा लागतो. वेळोवेळी याची माहिती वरिष्ठांना कळवावी लागते.
यांच्याकडे जबाबदारी
पद - संख्या - आरोपींची संख्या
पोलिस निरीक्षक - ३ - १२
सहायक पोलिस निरीक्षक - १५ - ५१
पोलिस उपनिरीक्षक - ४२ - १७५
श्रेणी पोलिस उपनिरीक्षक - ३ - ७
सहायक फौजदार - ५८ - १५०
हवालदार - २६८ - ६३०
पोलिस नाईक - ७१ - १३१
कॉन्स्टेबल - १८३ - ३७०
पोलिसठाणेनिहाय आरोपी
गडहिंग्लज - १४९
करवीर १४०
शाहूपुरी - १४०
शाहूवाडी - १३४
शिवाजीनगर - १२५
शिरोली एमआयडीसी - १२२
राजारामपुरी - ८३
जुना राजवाडा - ६५
शहापूर - ५७
कुरुंदवाड - ४८
हुपरी - ४३
कोडोली -४१
पन्हाळा - ३६
भुदरगड - ३५
जयसिंगपूर - ३०
इचलकरंजी - २९
लक्ष्मीपुरी - २८
आजरा - २४
कागल - २४
मुरगुड - २२
गांधीनगर - २२
चंदगड - २१
गोकुळ शिरगाव - २१
पेठ वडगाव - २०
शिरोळ - १४
नेसरी - १३
हातकणंगले - १२
इस्पुर्ली - ११
कळे - १०
गगनबावडा - १०
दत्तक योजनेतून आरोपी आणि पोलिसांमधील संवाद कायम राहील. यातून गुन्हे कमी करण्यासह आरोपींना समाजाच्या मुख्य प्रवाहात आणण्याचेही काम होईल. - महेंद्र पंडित - पोलिस अधीक्षक