कोल्हापूर पोलिसांनी चोरीस गेलेले ५४ लाखांचे दागिने मूळ मालकांना केले परत, पोलिस-नागरिकांचा जन संवाद उपक्रम
By सचिन भोसले | Published: March 25, 2023 05:31 PM2023-03-25T17:31:36+5:302023-03-25T17:33:11+5:30
तब्बल १ किलो इतके सोन्याचे दागिने पोलिसांनी हस्तगत केले होते
कोल्हापूर: कोल्हापूरपोलिस दलाने चोरी, दरोडे, चेन स्नॅचिंग अशा गुन्ह्यांमध्ये आरोपींकडून हस्तगत केलेले ५४ लाख ४५ हजार किमतीचे एक किलो सोन्याचे दागिने मूळ मालकांनी परत केले. आज, शनिवारी पोलिस मुख्यालयातील अलंकार हॉल येथे झालेल्या पोलिस - नागरिकांच्या जनसंवाद उपक्रमात विशेष पोलीस महानिरीक्षक सुनील फुलारी यांच्या हस्ते हे दागिने मूळ मालकांना परत करण्यात आले.
चोरी, दरोडा, चेन स्नॅचिंग अशा विविध गुन्हयात चोरांनी लांबवलेले सोन्याचे दागिने कोल्हापूर पोलिस दलातील अधिकारी, कर्मचारी आणि तपासांतर्गत जप्त केले. चोर, दरोडेखोर यांना गजाआड करीत त्यांच्याकडून तब्बल १ किलो इतके सोन्याचे दागिने पोलिसांनी हस्तगत केले होते. हे दागिने मुळ मालकांना शनिवारी विशेष पोलीस महानिरीक्षक सुनील फुलारी व पोलीस जिल्हा पोलीस अधीक्षक शैलेश बलकवडे यांच्या हस्ते समारंभपूर्वक परत करण्यात आले.
यावेळी देवीचंद राठोड (कोल्हापूर) यांनी दहा किलो वजनाचा हरवलेल्या चांदीचा पास्ता मालकांना परत केला. सुप्रिया मुकुंद देशपांडे (रा.लक्ष्मीपुरी) यांनी बेवारस मयतावर अंत्यसंस्कार करण्यास पोलिसांना सतत मदत केली. अभिनंदन रामचंद्र मदभावी (रा .गणेशवाडी.ता. शिरोळ) यांनी स्वतःचा जीव धोक्यात घालून शेतकऱ्यांची जनावरे चोरणाऱ्या चोरट्याने पकडून दिले.
यासह कोल्हापूर पोलीस दलातील एकूण बारा पोलीस अधिकारी कर्मचारी अंमलदार यांनी स्वतःचा जीव धोक्यात घालून नागरिकांचे प्राण वाचून पोलीस दलाचा लौकिक वाढविल्याबद्दल त्यांना प्रशासित प्रशंसापत्र देऊन गौरवण्यात आले. यामध्ये पोलीस निरीक्षक राहुल वाघमारे (मुरगुड ) अंमलदार टी. आय .सावंत, एस. आर. हेगडे (लक्ष्मीपुरी), महिला पोलीस अंमलदार जे.एन.चौगुले (पोलीस नियंत्रण कक्ष), रमेश शेंडगे (मुरगुड), डी.डी. देवमारी , ए. आर. डूंनुंग(शिवाजीनगर), पी.एन .हंकारे, एस वी.खाडे, एन. ए. केरीपाळे (कुरुंदवाड), के.जी बेंडगे, ए .आर. पाटील (जुना राजवाडा पोलीस ठाणे) यांचा समावेश आहे. याप्रसंगी पोलीस अपर अधीक्षक जयश्री देसाई, पोलीस उपाधीक्षक (गृह)प्रिया पाटील, शहर पोलीस उपाधीक्षक मंगेश चव्हाण, आदी उपस्थित होते.