कोल्हापूर पोलिसांची प्रतिमा सुधारणार : संजय मोहिते
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 2, 2017 06:38 PM2017-05-02T18:38:17+5:302017-05-02T18:38:17+5:30
पारदर्शक पोलीस सेवा देण्याची हमी : अवैध व्यवसाय शंभर टक्केबंद राहतील
आॅनलाईन लोकमत
कोल्हापूर, दि. 0२ : कोल्हापूरच्या नागरिकांना अत्यंत पारदर्शक आणि चांगल्या पद्धतीची पोलीस सेवा देणे हे माझे कर्तव्य राहील. पोलीस यंत्रणेची प्रतिमा सुधारली जाईल. जास्तीत जास्त नागरिकांचा सहभाग पोलिसांच्या कार्यात घेऊन कोल्हापूर जिल्हा अधिक सुरक्षित करण्यासाठी प्रयत्न राहतील. येथील अवैध व्यवसाय शंभर टक्के बंद केले जातील. दिवसाचे २४ तासमाझ्या मातीला व कोल्हापूरच्या जनतेला वाहून देण्यासाठी मी येथे आलो आहे, अशी ग्वाही नूतन पोलीस अधीक्षक संजय मोहिते यांनी दिली.
मंगळवारी त्यांनी कोल्हापूर पोलीस अधीक्षकपदाची सूत्रे तत्कालीन पोलीस अधीक्षक एम. बी. तांबडे यांच्याकडून स्वीकारली. राज्य व भारतीय पोलीस सेवेतील पोलीस अधीक्षक, उपायुक्त संवर्गातील १०४ आयपीएस अधिकाऱ्यांच्या बदल्यांचे आदेश गृहविभागाने गुरुवारी (दि. २७) काढले. त्यामध्ये जिल्हा पोलीस अधीक्षक एम. बी. तांबडे यांची पदोन्नतीवर सोलापूर पोलीस आयुक्तपदी बदली झाली. त्यांच्या जागी मुंबई शहराचे पोलीस उपायुक्त संजय मोहिते यांची नियुक्ती करण्यात आली.
मोहिते यांनी मावळते पोलीस अधीक्षक तांबडे यांच्याकडून पदभार स्वीकारला. त्यानंतर मोहिते यांनी पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी ते म्हणाले, ‘कोल्हापूर पोलीस प्रशासनाच्या कामकाजाचा आढावा घेतला असता येथील पोलिसांची प्रतिमा सुधारण्यासाठी आपला सर्वतोपरी प्रयत्न राहील. तांबडे यांनी कमी वेळेत चांगले काम करून दाखविले आहे. तेच काम पुढे चांगल्या प्रकारे चालविण्याचा आपला प्रयत्न असेल. हातागाड्यांवरील कामगारांच्या पैशांच्या करांतून आम्ही पगार घेतो, त्यामुळे नागरिकांना पारदर्शक पोलीस सेवा देण्याचा प्रयत्न राहील. तक्रार अर्ज, दाखले, पासपोर्ट, वाहतूक समस्या यांमध्ये नागरिकांना कुठेही त्रास होणार नाही, याची काळजी घेतली जाईल.
जिल्ह्यातील अवैध धंदे बंद करणार का? या पत्रकारांनी विचारलेल्या प्रश्नावर ते म्हणाले, अवैध धंदे हे शंभर टक्के बंदच राहतील. मटका, जुगार, क्लब, दारू अड्ड्यांवर छापे टाकले म्हणून पोलिसांची जबाबदारी संपली नाही. तर त्याचे समूळ उच्चाटन केले पाहिजे. राजकीय दबावाखाली काम न करता गुन्हेगारी प्रवृत्तींना कायद्याने कायदा शिकविला जाईल. वर्चस्ववाद, पूर्ववैमनस्य, अनैतिक संबंध, आदी कारणांतून खुनाचे प्रमाण वाढत आहे, ते कमी कसे करता येईल, यावर आपला भर राहील, असे मोहिते यांनी सांगितले.