कोल्हापूर : दसरा चौकात शहीद कौस्तुभ राणे यांच्या अस्थिकलशाचे पूजन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 21, 2018 01:26 PM2018-08-21T13:26:11+5:302018-08-21T13:29:49+5:30
सकल मराठा समजातर्फे दसरा चौकात सुरू असलेल्या ठिय्या आंदोलनस्थळी शहीद कौस्तुभ राणे यांचा अस्थिकलश आणून त्याचे पूजन करण्यात आले. यावेळी शहिदांना आदरांजली वाहण्यात आली.
कोल्हापूर : सकल मराठा समजातर्फे दसरा चौकात सुरू असलेल्या ठिय्या आंदोलनस्थळी शहीद कौस्तुभ राणे यांचा अस्थिकलश आणून त्याचे पूजन करण्यात आले. यावेळी शहिदांना आदरांजली वाहण्यात आली.
सीमेवर अतिरेक्यांशी दोन हात करताना मेजर कौस्तुभ राणे हे शहीद झाले. त्यांना आदरांजली वाहण्यासाठी त्यांच्या अस्थी दसरा चौकामधील ठिय्या आंदोलनस्थळी आणल्या होत्या. यावेळी वसंतराव मुळीक यांनी अस्थिंचे पूजन केले. त्यांचे काका विजयराव राणे, बहीण अश्विनी तावडे आणि भावोजी जगदीश तावडे यांची प्रमुख उपस्थिती होती.
स्वप्नाली पार्टे, हर्षल सुर्वे, अवधूत पाटील, दिलीप देसाई, किशोर घाटगे, प्रकाश पाटील, सुनील पाटील, शिवाजी वारके, गौरव पाटील, राजदीप सुर्वे, राजू फरांडेकर यांच्यासह मोठ्या संख्येने नागरिक उपस्थित होते.
दुपारी शिवाजी पेठेतून आलेल्या संयुक्त मोर्चाचे स्वागत दसरा चौकात करण्यात आले. यावेळी ‘एक मराठा लाख मराठा’ अशा घोषणा देण्यात आल्या. मोर्चातील सहभागींनी अश्वारूढ छत्रपती शिवरायांच्या पुतळयास पुष्पहार अर्पण केला. राष्ट्रसेवा दलाचे पुरुषोत्तम खेडेकर यांनी आंदोलनस्थळी भेट दिली. यावेळी आंदोलनाच्या पुढील दिशेवर चर्चा केली.
आंदोलकांतर्फे बुधवारी होणाऱ्या पश्चिम महाराष्ट्राच्या समन्वयकांच्या बैठकीची तयारी सुरू आहे. बैठकीसाठी सोशल मीडियावरून समाजबांधवांना आवाहन करणे, बैठकीमध्ये मांडण्यात येणाऱ्या भूमिकेवरही प्रमुख कार्यकर्त्यांची चर्चा सुरू आहे.
दिवसभर जिल्ह्याच्या ग्रामीण भागातून आलेल्या अनेक गावांनी ठिय्या आंदोलनात सहभाग नोंदवून ‘मराठा आरक्षण मिळालेच पाहिजे’ अशा घोषणा दिल्या.