कोल्हापूर : स्टाफ पॅटर्नच्या विरोधात वीज कर्मचाऱ्यांचा संप
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 8, 2019 10:55 AM2019-01-08T10:55:42+5:302019-01-08T10:58:52+5:30
कोल्हापूर : प्रस्तावित स्टाफ पॅटर्नला विरोध म्हणून रविवारी (दि. ६) मध्यरात्रीपासून राज्यभरातील वीज कर्मचारी संपावर गेले. त्यात महावितरण , ...
कोल्हापूर : प्रस्तावित स्टाफ पॅटर्नला विरोध म्हणून रविवारी (दि. ६) मध्यरात्रीपासून राज्यभरातील वीज कर्मचारी संपावर गेले. त्यात महावितरण, महापारेषण व महानिर्मिती या तिन्ही कंपन्यांतील कर्मचारी सहभागी झाले. या कंपन्यांच्या कोल्हापुरातील कर्मचाऱ्यांनी ताराबाई पार्कमधील महावितरण कंपनीच्या कार्यालयासमोर द्वारसभा घेऊन सोमवारी जोरदार निदर्शने केली. परंतू या संपामुळे जिल्ह्यांत कुठेही वीज पुरवठा विस्कळीत झाला नसल्याचा दावा महावितरण कंपनीने केला आहे.
वीज मंडळातील तिन्ही कंपन्यामध्ये प्रस्तावित स्टाफ पॅटर्न लागू करण्यात येणार असून त्याविरुध्द कर्मचाऱ्यांमध्ये कमालीचा असंतोष आहे. हा पॅटर्न ५ मंडल मध्ये येत्या १ फेब्रुवारीपासून लागू करण्यात येत आहे. या पॅटर्नमुळे कर्मचाऱ्यांची पदे कमी होतील. अगोदरच वीज ग्राहक वाढविण्यासाठी प्रयत्न सुरु आहेत, त्यामुळे पदे कमी झाल्यास आहे त्या कर्मचाऱ्यांवर कामाचा ताण वाढेल अशी भिती कर्मचाऱ्यांना आहे. त्याशिवाय पेन्शन योजना लागू करा अशीही त्यांची प्रमुख मागणी आहे. त्यासाठीच हे कर्मचारी संपावर गेले आहेत.
या आंदोलनाअंतर्गत कोल्हापुरातील महावितरण कार्यालयासमोर वीज कर्मचाऱ्यांनी निदर्शने केली. त्यांनी मागण्यांच्या अनुषंगाने आणि सरकारच्या निषेधार्थ घोषणा देत परिसर दणाणून सोडला. या आंदोलनात वीज कर्मचाऱ्यांच्या विविध संघटनांचे पदाधिकारी, सदस्य सहभागी झाले. त्यात ‘वर्कर्स फेडरेशन’चे शकील महात, ‘एसईए’चे विनायक पाटील, ‘इंटक’चे चंद्रशेखर पुरंदरे, ‘कामगार महासंघा’चे तानाजी हातकर, ‘तांत्रिक कामगार संघटने’चे विजय चव्हाण, आदी सहभागी झाले. दरम्यान, महावितरणच्या कार्यालयासमोरील द्वारसभेत सुमारे १५०० कर्मचारी सहभागी झाले.
आज -उद्या देशव्यापी संप
विद्युत कायदा २००३ मध्ये कांही बदल सुचविण्यात आले असून हा कायदा आता संसदेत मांडण्यात येणार असून, त्यात केल्या जाणाऱ्या सुधारणांमुळे वीज क्षेत्रावरच गंडांतर येणार आहे. याविरोधात देशभरातील वीज क्षेत्रातील कर्मचाऱ्यामध्ये संतापाची लाट आहे. त्यांनी आज, व उद्या, बुधवारी होणाऱ्या कामगारांच्या देशव्यापी संपात सहभागी होण्याचा निर्णय घेतला आहे.
वीजपुरवठा सुरळीतचा दावा
कोल्हापूर परिमंडलाच्या हजेरी पटावरील ३८६६ कर्मचाऱ्यांपैकी १५०४ कर्मचारी सोमवारी उपस्थित होते. २२६५ कर्मचारी अनुपस्थित अथवा संपावर, ९७ कर्मचारी रजा अथवा साप्ताहिक सुटी अथवा दौऱ्यावर होते. तरीपण वीजपुरवठा सुरळीत आहे. बाह्यस्रोत कंत्राटी कर्मचारी आणि संपावर नसलेल्या कर्मचाऱ्यांमुळे संपकाळात वीजसेवा सुरळीत सुरू आहे. कोल्हापूर जिल्ह्यात महावितरणची १२५ वीज उपकेंद्रे आहेत. या उपकेंद्रांचा वीजपुरवठा सुरळीत ठेवण्यासाठी महावितरणने कंत्राटी कर्मचाऱ्यांची मदत घेतली.