Kolhapur: होमटाऊन वगळून सहाशे पोलिसांच्या दिवसात बदल्या शहरातील पोलिस ठाण्यांना प्राधान्य
By उद्धव गोडसे | Published: May 29, 2023 10:50 PM2023-05-29T22:50:50+5:302023-05-29T22:51:16+5:30
Kolhapur: जिल्हा पोलिस दलातील सुमारे ६०० पोलिसांच्या प्रशासकीय बदल्यांची प्रक्रिया सोमवारी (दि. २९) मुख्यालयातील अलंकार हॉलमध्ये पार पडली. आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर त्यांचा तालुका वगळून पोलिसांना बदलीचे ठिकाण देण्यात आले.
- उद्धव गोडसे
कोल्हापूर : जिल्हा पोलिस दलातील सुमारे ६०० पोलिसांच्या प्रशासकीय बदल्यांची प्रक्रिया सोमवारी (दि. २९) मुख्यालयातील अलंकार हॉलमध्ये पार पडली. आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर त्यांचा तालुका वगळून पोलिसांना बदलीचे ठिकाण देण्यात आले. बहुतांश पोलिसांनी शहरातील पोलिस ठाण्यांना प्राधान्य दिले होते. मात्र, जागांची उपलब्धता लक्षात घेऊन बदल्या करण्यात आल्या. त्यामुळे अनेकांना पसंती क्रमावर पाणी सोडावे लागले.
गेल्या दोन वर्षांपासून कोरोना संसर्गामुळे पोलिसांच्या प्रशासकीय बदल्यांची प्रक्रिया रखडली होती. एप्रिल महिन्यातच बदल्या होतील, असे तत्कालीन पोलिस अधीक्षक शैलेश बलकवडे यांनी जाहीर केले होते. मात्र, तांत्रिक अडचणींमुळे बदल्यांची प्रक्रिया लांबली. अखेर नूतन पोलिस अधीक्षक महेंद्र पंडित यांनी सोमवारी बदल्यांची प्रक्रिया पार पाडली. यासाठी अलंकार हॉलमध्ये व्यवस्था करण्यात आली होती. सकाळी सातपासून प्रक्रियेला सुरुवात झाली. ग्रेड उपनिरीक्षक, सहायक फौजदार, पोलिस हवालदार, पोलिस नाईक आणि पोलिस शिपाई यांच्या बदल्यांची प्रक्रिया रात्री आठपर्यंत पार पडली. प्रत्येक कर्मचा-याचा पसंती क्रम आणि उपलब्ध जागा यांची पडताळणी करून बदलीचे ठिकाण देण्याचा प्रयत्न पोलिस अधीक्षकांनी केला. मोटार परिवहन विभागातील बदल्यांची प्रक्रिया रात्री उशिरापर्यंत सुरू होती.
आगामी निवडणुका लक्षात घेऊन पोलिसांना त्यांच्या मूळ तालुक्याबाहेरचे पोलिस ठाणे मिळावे, याची खबरदारी अधिका-यांनी घेतली. त्यासाठी काही पोलिसांना पसंती क्रमावर पाणी सोडावे लागले. मात्र, मागितलेल्या पोलिस ठाण्यापासून जवळचे पोलिस ठाणे देण्यास अधिका-यांनी प्राधान्य दिले. मुलांचे शिक्षण, राहण्याचे ठिकाण या सोयींमुळे अनेकांनी शहरातील पोलिस ठाण्यांना प्राधान्य दिले होते. या तुलनेत चंदगड, नेसरी, आजरा, गगनबावडा, राधानगरी, शाहूवाडी, गारगोटी या पोलिस ठाण्यांची मागणी कमी होती. पोलिस अधीक्षक महेंद्र पंडित, अपर पोलिस अधीक्षक जयश्री देसाई, उपअधीक्षक प्रिया पाटील, अजित टिके, समीरसिंह साळवे यांच्या उपस्थितीत बदल्यांची प्रक्रिया पार पडली.