कोल्हापूर : जिल्हा परिषदेत सोमवारी, शुक्रवारी अधिकाऱ्यांची उपस्थिती अनिवार्य
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 6, 2018 11:59 AM2018-04-06T11:59:15+5:302018-04-06T11:59:15+5:30
बाराही तालुक्यांतून येणाऱ्या अभ्यागतांच्या सोईसाठी सोमवार आणि शुक्रवारी अधिकाऱ्यांनी जिल्हा परिषदेत थांबणे अनिवार्य असल्याचे परिपत्रक मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. कुणाल खेमनार यांनी काढले आहे. तसेच कर्मचाऱ्यांनीही कोणती शिस्त पाळली पाहिजे, याबाबत या परिपत्रकात सविस्तर सूचना करण्यात आल्या आहेत.
कोल्हापूर : बाराही तालुक्यांतून येणाऱ्या अभ्यागतांच्या सोईसाठी सोमवार आणि शुक्रवारी अधिकाऱ्यांनी जिल्हा परिषदेत थांबणे अनिवार्य असल्याचे परिपत्रक मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. कुणाल खेमनार यांनी काढले आहे. तसेच कर्मचाऱ्यांनीही कोणती शिस्त पाळली पाहिजे, याबाबत या परिपत्रकात सविस्तर सूचना करण्यात आल्या आहेत.
जिल्हा परिषदेच्या सर्वसाधारण सभेमध्ये या अनुषंगाने अनेक वेळा चर्चा झाली होती. या पार्श्वभूमीवर डॉ. खेमनार यांनी हे परिपत्रक काढले आहे. सोमवारी आणि शुक्रवारी सकाळी ११ ते १ व दुपारी ३ ते ५ ही वेळ निश्चित करून येणाऱ्यांच्या अडचणी समजून घेऊन त्यांचे समाधान करणे आवश्यक असल्याचे परिपत्रकात म्हटले आहे.
महत्त्वाच्या बैठका, संपर्क दौरे असल्यास तशी अभ्यागतांना पूर्वकल्पना द्यावी, दूरध्वनी, ई-मेल यांचा वापर करून संबंधितांना त्यांच्या कामासाठी वारंवार जिल्हा परिषदेत यावे लागणार नाही, याची काळजी घ्यावी; दुपारच्या जेवणाची वेळ दुपारी दीड ते दोन अशी ठरली आहे. तिचे पालन व्हावे. कर्मचाऱ्यांनी वेळेवर हजर राहणे. आवश्यकतेनुसार गणवेश, ओळखपत्र धारण करावे. कार्यालयीन शिस्तीचे आणि स्वच्छतेचे पालन करावे, अशाही सूचना देण्यात आल्या आहेत.
अधिकाऱ्यांनी फिरतीच्या ठिकाणी जातानाही कार्यालयाला स्पष्ट कल्पना द्यावी. तालुकास्तरावरून येणाऱ्या कर्मचाऱ्यांनी जिल्हा परिषदेतील तळमजल्यावरील माहिती कक्षातील नोंदवहीमध्ये कामाच्या स्वरूपाची नोंद करणे बंधनकारक आहे.
वाहनचालक व परिचर संवर्गातील कर्मचाऱ्यांनी कार्यालयीन वेळेत गणवेश परिधान करावा. जिल्हा परिषदेतील कर्मचाऱ्यांनीही कार्यालयीन कामासाठी बाहेर जाताना हालचाल नोंदवहीमध्ये नोंद करावी, अशा सूचना या परिपत्रकाद्वारे केल्या आहेत.
जुन्या वस्तूंचे निर्लेखन करा
कार्यालयीन दुरुस्ती, संगणक, स्टेशनरी खरेदी, जुन्या वस्तूंचे वेळेत निर्लेखन करण्याकडे विभागप्रमुखांनी नियमित लक्ष द्यावे. गरजेच्या वस्तूंचा वार्षिक आराखडा बनवून नियमाप्रमाणे आपल्या विभागाकडे / जिल्हा परिषदेकडे विहित मुदतीत याबाबतची मागणी करावी. आवश्यक वस्तूंचा तुटवडा भासून त्याचा विकासकामांवर विपरित परिणाम होऊ नये, याची दक्षता विभागप्रमुखांनी घ्यावी, अशीही सूचना देण्यात आली आहे.