‘लोकमत’च्या चौघांना प्रेस क्लबच्या पुरस्काराचा बहुमान; शुक्रवारी होणार वितरण
By ऑनलाइन लोकमत | Published: January 4, 2023 12:52 PM2023-01-04T12:52:30+5:302023-01-04T12:52:54+5:30
वरिष्ठ पत्रकार समीर देशपांडे, ज्येष्ठ छायाचित्रकार नसीर अत्तार, छायाचित्रकार आदित्य वेल्हाळ व ‘लोकमत’ ऑनलाइनच्या दूर्वा दळवी यांचा समावेश
कोल्हापूर : येथील कोल्हापूर प्रेस क्लब या पत्रकारांच्या प्रातिनिधिक संस्थेच्या वतीने देण्यात येणाऱ्या पुरस्कारांमध्ये सर्वाधिक चार पुरस्कार ‘लोकमत’च्या पत्रकार छायाचित्रकारांनी पटकावले. वरिष्ठ पत्रकार समीर देशपांडे, ज्येष्ठ छायाचित्रकार नसीर अत्तार, छायाचित्रकार आदित्य वेल्हाळ व ‘लोकमत’ ऑनलाइनच्या दूर्वा दळवी यांचा त्यामध्ये समावेश आहे.
या पुरस्कारांचे वितरण शुक्रवारी (दि. ६ जानेवारी) सायंकाळी ६ वाजता होणाऱ्या समारंभात होईल. या कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून शाहू छत्रपती महाराज उपस्थित राहणार आहेत. स्तंभलेखक सुधींद्र कुलकर्णी यांचे ‘सद्य:स्थिती आणि पत्रकारितेसमोरील आव्हाने’ या विषयावर यावेळी व्याख्यान होणार आहे. प्रत्येकी ५ हजार रुपये रोख, सन्मानचिन्ह, असे पुरस्काराचे स्वरूप आहे.
पुरस्कार विजेते देशपांडे हे गेली २४ वर्षे पत्रकारितेत आहे. त्यांच्या पत्रकारितेची सुरुवात आजरा येथून झाली. मुख्यत: समाजातील सकारात्मक मांडणी ते करत आले आहेत. कोरोना काळात त्यांनी स्वत: पॉझिटिव्ह असतानाही केलेले वार्तांकन महत्त्वाचे ठरले. ज्येष्ठ छायाचित्रकार अतार हे गेली ३३ वर्षे वृत्तपत्रात छायाचित्रकार आहेत. छायाचित्रणाचा वारसा त्यांच्याकडे वडिलांकडून आला. उत्तम छायाचित्रासाठी रस्त्यावर पळणारा फोटोग्राफर अशी त्यांची कोल्हापूरच्या वृत्तपत्रसृष्टीत ओळख आहे.
वेगळी नजर असलेला छायाचित्रकार अशी आदित्य वेल्हाळ यांनी आपली ओळख सिद्ध केली आहे. गेली अठरा वर्षे त्यांच्या हातात कॅमेरा आहे. वडिलांकडून त्यांनाही या व्यवसायाचा वारसा लाभला. दूर्वा दळवी मूळच्या कोकणातील असून त्या गेल्या सात वर्षांपासून ऑनलाइन जर्नालिझममध्ये आहेत. त्यांनी अल्पावधीतच आपल्या कामाचा ठसा उमटवला आहे.
दरवर्षीप्रमाणे यंदा २०२० आणि २०२१ या दोन वर्षांमध्ये उल्लेखनीय कामगिरी केलेले पत्रकार, छायाचित्रकार कॅमेरामन यांना हे पुरस्कार जाहीर झाले आहेत. अन्य पुरस्कार विजेत्यांत दयानंद लिपारे (लोकसत्ता) व एकनाथ नाईक (दैनिक पुढारी) यांना २०२१ सालचा पुरस्कार विभागून देण्यात आला. इलेक्ट्रॉनिक माध्यमातून शेखर पाटील (ई टीव्ही) यांना २०२१ सालचा पुरस्कार जाहीर झाला.