कोल्हापूर : लसणाची फोडणी झाली स्वस्त, घाऊक बाजारात दहा रुपयांपर्यंत घसरण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 3, 2018 02:51 PM2018-09-03T14:51:16+5:302018-09-03T14:54:42+5:30
गेले वर्षभर सुरू असलेली लसणाची घसरण अधिकच होऊ लागली असून, घाऊक बाजारात १० रुपये किलोपर्यंत पांढराशुभ्र लसूण मिळत आहे.
कोल्हापूर : गेले वर्षभर सुरू असलेली लसणाची घसरण अधिकच होऊ लागली असून, घाऊक बाजारात १० रुपये किलोपर्यंत पांढराशुभ्र लसूण मिळत आहे.
भाजीपाल्याच्या दरातही घसरण सुरू असून टोमॅटोचा दर तर अक्षरश: मातीमोल झाला आहे. घाऊक बाजारात एक रुपया किलोपर्यंत दर खाली आल्याने शेतकरी हवालदिल झाला आहे. गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर ड्रायफ्रुटच्या दरात मात्र थोडी वाढ झाली आहे.
लसणाच्या दरात वर्षभरापासून घसरण सुरू आहे. शंभर रुपये किलोपासून लसणाचे दर घसरत ५० रुपयांपर्यंत आला होता; पण या आठवड्यात दरात एकदमच घसरण झाली आहे. आवक कमी असूनही, उठाव नसल्याने दरात घसरण झाल्याचे व्यापाऱ्यांचे मत आहे.
कोल्हापूर बाजार समितीत रोज २०० पिशव्या लसणाची आवक होत आहे; तरीही दर १० रुपयांपर्यंत दर खाली आला आहे. कांद्याच्या दरातही घसरण झाली आहे. घाऊक बाजारात कांद्याचा पाच रुपये प्रतिकिलो दर आहे. बटाट्याचा दर १९ रुपये प्रतिकिलो आहे.
भाजीपाल्याचे दरही कमी झाले असून श्रावण सुरू असला तरी भाज्यांची आवक जास्त असल्याने दरावर परिणाम दिसतो. कोबी, वांगी, ढबू, घेवडा, ओला वाटाणा, भेंडीचे दर गेल्या आठवड्याच्या तुलनेत कमी झाले आहेत.
वरणा, दोडका, ओल्या मिरचीचा दर काहीसे स्थिर राहिले आहेत. फ्लॉवरचे दरही कमी झाले आहेत. बाजारात फ्लॉवरचा गड्डा पाच ते सात रुपये प्रतिनग आहे.
कोथिंबिरीची आवक वाढली असली तरी मागणी जास्त असल्याने दरात वाढ झाली आहे. घाऊक बाजारात पाच रुपये पेंढी असून कांदापात, मेथी, पोकळा, पालक या पालेभाज्यांच्या दरात फारसा चढउतार दिसत नाही.
फळबाजारात मोसंबी, संत्री, चिक्कू, पेरूची आवक जेमतेम आहे. डाळींब व सीताफळांची आवक वाढली आहे. डाळिंबाची आवक जास्त असल्याने दरात कमालीची घसरण झाली आहे. लहान डाळिंबाचे तर १५ रुपयांना ढीग आहेत.
शेंगदाण्याच्या दरात वाढ झाली असून कडधान्यही थोडे वधारले आहे. गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर ड्रायफ्रुटची आवक जास्त असून मागणीही वाढू लागली आहे. नारळाची आवक थोडी कमी झाल्याने दर वाढले आहेत.
‘सिमला’ सफरचंदांची आवक वाढली!
पावसाळ्यात परदेशातून सफरचंदांची आवक व्हायची. आता सिमला येथूनही आवक सुरू झाली असून, त्यात दर आठवड्याला वाढ होत आहे. बाजार समितीत रोज १२०० हून अधिक बॉक्सची आवक होत आहे. किरकोळ बाजारात ५० पासून ११० रुपयांपर्यंत प्रतिकिलोचा दर आहे.