कोल्हापूर : शिवाजी विद्यापीठात खेळाडूंचा गौरव; न्यू कॉलेजचा सन्मान
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 9, 2018 05:20 PM2018-03-09T17:20:10+5:302018-03-09T17:20:10+5:30
शिवाजी विद्यापीठातील क्रीडा अधिविभागातर्फे आयोजित सन २०१६-१७ या वर्षी अखिल भारतीय आंतरविद्यापीठ क्रीडा स्पर्धेत प्रावीण्य मिळालेल्या खेळाडूंच्या गुणगौरव कार्यक्रमात ते बोलत होते. विद्यापीठाच्या शिक्षणशास्त्र विभागाच्या सभागृहातील या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी कुलगुरू डॉ. देवानंद शिंदे होते.
कोल्हापूर : निव्वळ आवड म्हणून नको, तर खेळाकडे करिअरच्या दृष्टीने बघा. त्या अनुषंगाने कार्यरत रहा, असे आवाहन शिवछत्रपती राज्य क्रीडा जीवनगौरव पुरस्कार विजेते बिभीषण पाटील यांनी शुक्रवारी येथे केले.
शिवाजी विद्यापीठातील क्रीडा अधिविभागातर्फे आयोजित सन २०१६-१७ या वर्षी अखिल भारतीय आंतरविद्यापीठ क्रीडा स्पर्धेत प्रावीण्य मिळालेल्या खेळाडूंच्या गुणगौरव कार्यक्रमात ते बोलत होते. विद्यापीठाच्या शिक्षणशास्त्र विभागाच्या सभागृहातील या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी कुलगुरू डॉ. देवानंद शिंदे होते.
शिवछत्रपती राज्य क्रीडा जीवनगौरव पुरस्कार विजेते बिभीषण पाटील म्हणाले, खेळातील अत्याधुनिक तंत्रज्ञान समजून घेऊन खेळाडूंनी कामगिरी करणे महत्त्वाचे ठरणार आहे. त्यांनी अधिकृत संघटनेच्या स्पर्धांमध्ये सहभागी व्हावे. शासकीय नोकरी मिळविण्यासाठी खेळाच्या माध्यमातून प्रयत्न करावेत.
कुलगुरू डॉ. देवानंद शिंदे म्हणाले, ज्ञानक्षेत्रासह क्रीडाक्षेत्रामध्ये विद्यापीठाची घोडदौड सुरू आहे. यश हे नेहमी प्रवाही असते. त्यामुळे याबाबत सातत्याने लक्ष केंद्रित करावे. प्रशिक्षक, शारीरिक शिक्षण संचालक यांनी कृतिशील सल्ला देऊन यशस्वी खेळाडूंची मालिका निर्माण करावी.
या कार्यक्रमात अखिल भारतीय आंतरविद्यापीठ स्पर्धेमध्ये विशेष प्रावीण्य व सर्वाधिक ६४० गुण संपादन केल्याबदल न्यू कॉलेजला ‘सन २०१६-१७ मधील सर्वोत्कृष्ट महाविद्यालय’ म्हणून ‘क्रीडामहर्षी मेघनाथ नागेशकर ट्रॉफी’ प्रमुख उपस्थितांच्या हस्ते देऊन सन्मानित करण्यात आले. यानंतर गुणवंत खेळाडू, शिवछत्रपती राज्य क्रीडा पुरस्कार, जीवनगौरव पुरस्कार, जिजामाता राज्य क्रीडा पुरस्कारप्राप्त खेळाडू, प्रशिक्षक, मार्गदर्शक आणि संघटकांचा सत्कार करण्यात आला.
यावेळी विद्यापीठाचे शैक्षणिक सल्लागार डॉ. डी. आर. मोरे, न्यू कॉलेजचे प्राचार्य डॉ. एन. व्ही. नलवडे, अमर सासने, किरण पाटील, आदी उपस्थित होते. क्रीडा व शारीरिक शिक्षण विभागाचे प्रभारी संचालक डॉ. पी. टी. गायकवाड यांनी प्रास्ताविक केले. प्रशिक्षक जे. एच. इंगळे यांनी खेळाडूंना शपथ दिली. डॉ. दीपक पाटील-डांगे यांनी सूत्रसंचालन केले. शारीरिक शिक्षण संचालक विजय रोकडे यांनी आभार मानले.
खेळाडूंना दोन लाखांची मदत
आंतरराष्ट्रीय पातळीवरील स्पर्धेत सहभागी होणाऱ्या खेळाडूंना विद्यापीठातर्फे दोन लाख रुपयांची मदत देण्यात येईल. विद्यापीठाच्या माध्यमातून स्पर्धेत सहभागी होणाऱ्या खेळाडूंचा विमा उतरविला जाईल, असे कुलगुरू डॉ. शिंदे यांनी सांगितले.
दरम्यान, या कार्यक्रमास अनुपस्थित असलेल्या महाविद्यालयांतील शारीरिक शिक्षण संचालकांबाबत कुलगुरू डॉ. शिंदे यांनी नाराजी व्यक्त केली. खेळाडू आणि क्रीडाविकासात योगदान देता येत नसेल, शारीरिक शिक्षण संचालकांनी पदावर राहण्याबाबत विचार करावा. या संचालकांच्या काही अडचणी, प्रश्न असल्यास त्यांबाबत लवकरच बैठक आयोजित केली जाईल, असे त्यांनी सांगितले.