कोल्हापूर : ‘प्राथमिक’ शिक्षकांचे वेतन थकले, आंदोलनाचा इशारा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 28, 2018 01:58 PM2018-05-28T13:58:29+5:302018-05-28T13:58:29+5:30
टप्पा आणि नियमित अनुदानावरील खासगी प्राथमिक शाळांमधील कोल्हापूर जिल्ह्यातील सुमारे दीडशे शिक्षकांचे वेतन थकले आहे. त्यासाठी दोषी असणाऱ्यांवर कारवाई करावी, अन्यथा आंदोलन करण्याचा इशारा महाराष्ट्र राज्य मान्य खासगी प्राथमिक शिक्षक व शिक्षकेतर महासंघाने दिला आहे.
कोल्हापूर : टप्पा आणि नियमित अनुदानावरील खासगी प्राथमिक शाळांमधील कोल्हापूर जिल्ह्यातील सुमारे दीडशे शिक्षकांचे वेतन थकले आहे. त्यासाठी दोषी असणाऱ्यांवर कारवाई करावी, अन्यथा आंदोलन करण्याचा इशारा महाराष्ट्र राज्य मान्य खासगी प्राथमिक शिक्षक व शिक्षकेतर महासंघाने दिला आहे.
शासनाच्या वित्त विभाग आणि शिक्षण विभागाच्या आदेशानुसार टप्पा अनुदानावरील खासगी प्राथमिक शाळांमधील शिक्षकांचे थकीत वेतन दि. ३१ मार्च २०१८ अखेर अदा होणे आवश्यक होते; पण, ते आजअखेर अदा झालेले नाही. त्यात नियमित अनुदानावरील शाळांतील शिक्षकांचा समावेश आहे.
त्यातील काही शिक्षकांचे वेतन हे आठ, सहा महिने, तर काहींचे चार आणि दोन महिन्यांपासून अदा झालेले नाही. जिल्हा वेतन पथक आणि कोषागार कार्यालयातील असमन्वयामुळे संबंधित शिक्षकांचे वेतन अदा झाला नसल्याचा आरोप महासंघाचा आहे. वेतन मिळाले नसल्याने या शिक्षकांना आर्थिक कसरत करावी लागत आहे.
अधिकाऱ्यांना कार्यमुक्त करू नये
प्राथमिक शिक्षण विभागाचे वेतन पथक आणि जिल्हा कोषागार कार्यालयातील असमन्वयामुळे या शिक्षकांचे वेतन थकले असल्याचे राज्य मान्य खासगी प्राथमिक शिक्षक व शिक्षकेतर महासंघाचे राज्य उपाध्यक्ष संतोष आयरे यांनी सांगितले.
ते म्हणाले, संबंधित वेतन थकीत राहण्यामागे जे कार्यालय दोषी असेल त्या कार्यालयावर जबाबदारी निश्चित करून तेथील अधिकाऱ्यांवर कारवाई करावी. संबंधित अधिकाऱ्यांची बदली होणार असल्याचे समजते.
त्यामुळे थकीत वेतन प्रकरणाची चौकशी होईपर्यंत या अधिकाऱ्यांना कार्यमुक्त करू नये. त्यासह थकीत वेतन लवकर अदा करणे, अशी महासंघाची मागणी आहे. या मागण्यांची पूर्तता लवकर व्हावी अन्यथा महासंघातर्फे तीव्र आंदोलन केले जाईल.