कोल्हापूर : शिंगोशी मार्केट येथील व्हिडीओ गेम पार्लरवर छापा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 11, 2019 05:17 PM2019-01-11T17:17:57+5:302019-01-11T17:20:00+5:30
कोल्हापूर शहरातील मिरजकर तिकटी ते रेसकोर्स नाका जाणाऱ्या मार्गावर शिंगोशी मार्केट, तस्ते गल्ली येथील बंद गाळ्यामध्ये बेकायदेशीररीत्या सुरू असलेल्या व्हिडीओ गेम पार्लरवर जुना राजवाडा पोलिसांनी गुरुवारी छापा टाकून पार्लरमालकासह आठजणांना अटक केली. या ठिकाणी गेम पार्लरच्या नावाखाली जुगार सुरू होता. या कारवाईनंतर शहरातील बहुतांश व्हिडीओ पार्लर बंद करण्यात आली.
कोल्हापूर : शहरातील मिरजकर तिकटी ते रेसकोर्स नाका जाणाऱ्या मार्गावर शिंगोशी मार्केट, तस्ते गल्ली येथील बंद गाळ्यामध्ये बेकायदेशीररीत्या सुरू असलेल्या व्हिडीओ गेम पार्लरवर जुना राजवाडा पोलिसांनी गुरुवारी छापा टाकून पार्लरमालकासह आठजणांना अटक केली. या ठिकाणी गेम पार्लरच्या नावाखाली जुगार सुरू होता. या कारवाईनंतर शहरातील बहुतांश व्हिडीओ पार्लर बंद करण्यात आली.
संशयित मालक सौरभ उदय गायकवाड (वय १९), अक्षय सुनील सातवेकर (२२, पाचगाव, ता. करवीर), वैभव वसंत पाटील (३२), प्रशांत नागाप्पा हलगेकर (६५, दोघे, रा. मोरेवाडी, ता. करवीर), विश्वजित ज्ञानदेव सूर्यवंशी (२२), विशाल शिवाजी कुंभार (२७), सूरज दिनकर नडाळे (२०), सुमित महादेव आरडे (२३, सर्व रा. कळंबा, ता. करवीर) अशी त्यांची नावे आहेत. त्यांच्या ताब्यातून २९ मशीनसह रोकड असा सुमारे पाच लाख १० हजार किमतीचा मुद्देमाल जप्त केला.
मिरजकर तिकटी ते रेसकोर्स नाका जाणाऱ्या मार्गावर शिंगोशी मार्केट, तस्ते गल्ली येथील गाळ्यामध्ये सौरभ गायकवाड आणि अक्षय सातवेकर यांनी बेकायदेशीर व्हिडीओ गेम पार्लर सुरू केले होते. त्याचा परवाना घेतला नव्हता.
या ठिकाणी राजरोसपणे जुगार सुरू असल्याची माहिती पोलीस निरीक्षक मानसिंह खोचे यांना मिळाली.
त्यांनी पंटरच्या मदतीने गुरुवारी सायंकाळी साडेपाचच्या सुमारास खात्री करून छापा टाकला असता जुगार सुरू असल्याचे दिसून आले.
अचानक पडलेल्या छाप्याने जुगार खेळणारे भांबावून गेले. पोलिसांनी गेम पार्लरमधील २९ मशीन, रोख रक्कम असा सुमारे पाच लाख किमतीचा मुद्देमाल जप्त केला. व्हिडीओ पार्लरचे मालक, व्यवस्थापक व जुगार खेळणाऱ्या व्यक्तींवर गुन्हा दाखल केला. या कारवाईने शहरातील व्हिडीओ गेम पार्लर मालकांचे धाबे दणाणले आहे.