कोल्हापूर : प्रशासनात राहून समाजहिताला प्राधान्य द्या : विनय कोरे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 9, 2018 04:13 PM2018-07-09T16:13:59+5:302018-07-09T16:20:41+5:30
विविध स्पर्धा परीक्षांतील गुणवंतांनी समाजाला दिशा देण्याचे काम करावे. त्यांनी प्रशासनात काम करताना समाजहिताला प्राधान्य द्यावे, असे प्रतिपादन माजी मंत्री विनय कोरे यांनी येथे केले.
कोल्हापूर : विविध स्पर्धा परीक्षांतील गुणवंतांनी समाजाला दिशा देण्याचे काम करावे. त्यांनी प्रशासनात काम करताना समाजहिताला प्राधान्य द्यावे, असे प्रतिपादन माजी मंत्री विनय कोरे यांनी येथे केले.
येथील राजर्षी शाहू स्मारक भवनमध्ये शाहूवाडी-पन्हाळावासीय सेवा संघातर्फे आयोजित गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार व पुरस्कार वितरण कार्यक्रमात ते बोलत होते. अध्यक्षस्थानी ज्येष्ठ साहित्यिक डॉ. चंद्रकुमार नलगे होते.
कोल्हापूर जिल्हा शैक्षणिक व्यासपीठाचे अध्यक्ष एस. डी. पाटील यांना माजी मंत्री कोरे यांच्या हस्ते ‘शाहूवाडी-पन्हाळा रत्न’ पुरस्कार प्रदान करण्यात आला. मानपत्र, कोल्हापुरी फेटा, शाहू चरित्रग्रंथ, शाल व श्रीफळ असे पुरस्काराचे स्वरूप होते.
माजी मंत्री कोरे म्हणाले, आठवीतून शाळा सोडणाऱ्या विद्यार्थ्यांचे शाहूवाडी तालुक्यात मोठे प्रमाण आहे. या विद्यार्थ्यांना शिक्षणाच्या प्रवाहात ठेवण्यासाठी वाडीवस्त्यांवर शिक्षणाचा प्रसार होण्याची गरज आहे. त्या दृष्टीने शासनस्तरावर प्रयत्न व्हावेत. शाहूवाडी-पन्हाळावासीय सेवा संघाच्या माध्यमातून विविध उपक्रम राबविण्यासाठी माझा पुढाकार राहील.
ज्येष्ठ साहित्यिक नलगे म्हणाले, गुणवत्तेबाबत शाहूवाडी तालुका वेगाने पुढे जात आहे. तालुक्यातील अनेक मुले शालेय परीक्षा, स्पर्धा परीक्षांमध्ये चमकत असून ते अभिमानास्पद आहे.
या कार्यक्रमात ज्येष्ठ साहित्यिक प्रा. चंद्रकुमार नलगे, प्रा. सर्जेराव शेटके-पाटील, लक्ष्य करिअर अकॅडमीचे संस्थापक लक्ष्मीकांत हंडे यांच्यासह विविध स्पर्धा परीक्षा, दहावी, बारावी परीक्षेतील गुणवंतांचा सत्कार करण्यात आला. दादा लाड, किरण लोहार, सुरेश बच्चे, व्ही. बी. पायमल, आदींनी मनोगत व्यक्त केले.
यावेळी पन्हाळा पंचायत समितीचे सभापती पृथ्वीराज सरनोबत, शाहूवाडी पंचायत समितीचे सभापती अश्विनी पाटील, सेवा संघाचे आनंदराव लोखंडे, अशोक पाटील, सुस्मिता लाड, शिवाजी पाटील, अशोक तोरसे, रवींद्र मोरे, आर. बी. पाटील, आदी उपस्थित होते. सेवा संघाचे अध्यक्ष अनिल चव्हाण यांनी प्रास्ताविक केले. सुधाकर डोणोलीकर यांनी मानपत्र वाचन केले. बाळाराम लाड यांनी सूत्रसंचालन केले. रवींद्र मदने यांनी आभार मानले.
कामाची पोचपावती
सत्काराला उत्तर देताना लाड म्हणाले, शिक्षणक्षेत्रात गेल्या ३५ वर्षांत केलेल्या कामाची पोहोचपावती शाहूवाडी-पन्हाळा सेवा संघाच्या या पुरस्काराद्वारे मिळाली आहे. याबद्दल मी संघाचा ऋणी आहे.