कोल्हापूर : तुरुंग, वसतिगृहात तूूरडाळ खपवा..., राज्य शासनाकडून जिल्हा प्रशासनाला ‘टार्गेट’
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 14, 2018 06:20 PM2018-05-14T18:20:50+5:302018-05-14T18:20:50+5:30
शासनाकडून तुरुंग, वसतिगृहे, शासकीय रुग्णालये व महाविद्यालये, अन्न व औषध प्रशासन, आदी कार्यालयांमध्ये तूरडाळ खपवा, असे ‘टार्गेट’च दिले आहे. त्यानुसार जिल्हा प्रशासनाने मागणी नोंदणीची कार्यवाही सुरू केली आहे.
प्रवीण देसाई
कोल्हापूर : राज्यात तूरडाळीचा साठा मोठ्या प्रमाणात शिल्लक आहे. तोंडावर पावसाळा असल्याने डाळ खराब होण्याची शक्यता आहे. यामुळे राज्य शासनाने कोणत्याही परिस्थितीत डाळीचा साठा संपविण्याचे उद्दिष्ट डोळ्यांसमोर ठेवले आहे. त्यातूनच शासनाकडून तुरुंग, वसतिगृहे, शासकीय रुग्णालये व महाविद्यालये, अन्न व औषध प्रशासन, आदी कार्यालयांमध्ये तूरडाळ खपवा, असे ‘टार्गेट’च दिले आहे. त्यानुसार जिल्हा प्रशासनाने मागणी नोंदणीची कार्यवाही सुरू केली आहे.
राज्य शासनाने शेतकऱ्यांकडून हमीभावाने तूरडाळ खरेदी केली आहे. जवळपास ४५ लाख क्विंटल तूर शिल्लक होती. त्यावर प्रक्रिया करून २५ लाख क्विंटल तूरडाळ तयार करण्यात आली आहे. इतक्या मोठ्या प्रमाणात असलेला साठा पावसाळ्यापूर्वी संपविण्याच्या विवंचनेत राज्य शासन आहे.
त्यामुळे अन्नसुरक्षेतील लाभार्थ्यांना रेशनवर तूरडाळ विक्रीबरोबरच आता तुरुंग, सरकारी वसतिगृहे, छत्रपती प्रमिलाराजे रुग्णालय, अन्न व औषध प्रशासन कार्यालय, अंगणवाड्या, जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शाळा, शासकीय महाविद्यालये, आदी ठिकाणी तूरडाळ खपवा, असे निर्देश पणन व पुरवठा विभागाच्या सचिवांनी जिल्हाधिकाऱ्यांना दिले आहेत.
जिल्हाधिकाऱ्यांनी याबाबत जिल्हा पुरवठा अधिकाऱ्यांना संबंधितांशी संपर्क साधून मागणी नोंदवून घेण्याच्या सूचना दिल्या. त्यानुसार नुकतीच जिल्हा पुरवठा अधिकाऱ्यांकडून कळंबा मध्यवर्ती कारागृहाचे अधीक्षक, जिल्हा परिषदेचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी (बाल विकास), जिल्हा परिषद प्राथमिक शिक्षण विभागाचे अधिकारी, समाजकल्याण विभागाचे सहायक आयुक्त, छत्रपती प्रमिलाराजे रुग्णालयाचे अधिकारी, अन्न व औषध प्रशासन कार्यालयाचे अधिकारी व शासकीय महाविद्यालयांचे प्रतिनिधी यांच्याकडून तूरडाळीच्या मागणीबाबत माहिती मागविली आहे. ही तूरडाळ संबंधित विभागांना थेट रेशनवर नसली तरी मार्केटिंग फेडरेशनच्या माध्यमातून विक्री केली जाणार आहे.
एकंदरीत शिल्लक राहिलेली तूरडाळ येनकेन प्रकारे खपविण्यासाठी सरकारकडून जिल्हा प्रशासनाला दिलेल्या उद्दिष्टामुळे चांगलीच धावपळ उडाली आहे. संबंधितांकडून जास्तीत जास्त मागणी नोंदवून घेण्यासाठी युद्धपातळीवर प्रयत्न सुरू आहेत.
विक्री ५५ रुपयांनीच होणार
रेशनवर ५५ रुपये दराने १ किलो तूरडाळीची विक्री होत आहे. त्याच दराने वसतिगृहे, शासकीय रुग्णालय व महाविद्यालये, अन्न व औषध प्रशासन, आदी कार्यालयांमध्ये तूरडाळीची विक्री होणार आहे.