कोल्हापूर : प्राध्यापकांचे २५ सप्टेंबरपासून बेमुदत कामबंद
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 15, 2018 04:45 PM2018-09-15T16:45:52+5:302018-09-15T16:49:49+5:30
उच्च शिक्षण क्षेत्राबाबत राज्य सरकारच्या असलेल्या उदासीन आणि नकारात्मक धोरणामुळे राज्यातील नियमित आणि तासिका तत्त्वावरील प्राध्यापकांवर (सीएचबीधारक) बेमुदत कामबंद आंदोलन करण्याची वेळ आली आहे.
कोल्हापूर : उच्च शिक्षण क्षेत्राबाबत राज्य सरकारच्या असलेल्या उदासीन आणि नकारात्मक धोरणामुळे राज्यातील नियमित आणि तासिका तत्त्वावरील प्राध्यापकांवर (सीएचबीधारक) बेमुदत कामबंद आंदोलन करण्याची वेळ आली आहे.
विविध मागण्यांकडे सरकारचे लक्ष वेधण्यासाठी महाराष्ट्र फेडरेशन आॅफ युनिव्हर्सिटी अँड कॉलेज टीचर्स असोसिएशनच्या (एम्फुक्टो)नेतृत्वाखाली प्राध्यापकांनी आंदोलन सुरू केले आहे. त्यातील एक भाग म्हणून रविवारी (दि. १६) दुपारी एक वाजता डॉ. बापूजी साळुंखे सभागृहात प्राध्यापकांचा मेळावा होणार आहे. त्यासाठी माजी आमदार बी. टी. देशमुख प्रमुख उपस्थित असणार आहेत, अशी माहिती शिवाजी विद्यापीठ शिक्षक संघाचे (सुटा) अध्यक्ष डॉ. आर. एच. पाटील यांनी येथे पत्रकार परिषदेत दिली.
अध्यक्ष पाटील म्हणाले, राज्यातील उच्च शिक्षण क्षेत्रातील भरतीबंदीमुळे सुमारे ११ हजार प्राध्यापक, सहायक प्राध्यापकांची पदे रिक्त आहेत. त्याचा परिणाम उच्च शिक्षणाच्या गुणवत्तेवर होत आहे; त्यामुळे रिक्त जागांवर प्राध्यापकांची कायमस्वरूपी भरती व्हावी, यासह विविध मागण्यांसाठी ‘एम्फुक्टो’ने दि. ६ आॅगस्टपासून आंदोलन सुरू केले.
या आंदोलनातील सहा टप्पे पूर्ण झाले आहेत; मात्र, अद्यापही राज्य सरकार अथवा उच्चशिक्षणमंत्री प्राध्यापकांच्या मागण्यांबाबत चर्चा करायला तयार नाहीत. प्रमुख कार्यवाह प्रा. डी. एन. पाटील म्हणाले, रविवारी होणाऱ्या मेळाव्यास शिवाजी विद्यापीठ आणि सोलापूर विद्यापीठातील प्राध्यापक उपस्थितीत राहणार आहेत. या पत्रकार परिषदेस प्रा. सुधाकर मानकर, टी. व्ही. स्वामी, आर. जी. कोरबू, आर. के. चव्हाण, आदी उपस्थित होते.
महाविद्यालयांचे कामकाज होणार ठप्प
प्रलंबित मागण्यांबाबत उच्च शिक्षण मंत्र्यांनी ‘एम्फुक्टो’समवेत चर्चा करून निर्णय न घेतल्यास दि. २५ सप्टेंबरपासून प्राध्यापकांच्यावतीने बेमुदत कामबंद आंदोलन केले जाणार आहे. या आंदोलनामुळे महाविद्यालयांचे कामकाज ठप्प होणार आहे. त्याची सर्वस्वी जबाबदारी राज्य शासनावर राहील, असे ‘सुटा’चे सहकार्यवाह प्रा. सुभाष जाधव यांनी सांगितले.