कोल्हापूर : परशुराम जयंतीला परवानगी नाकारल्याने निषेध
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 28, 2018 01:45 PM2018-04-28T13:45:49+5:302018-04-28T13:45:49+5:30
शनिवारवाडा पुणे येथे परशुराम जयंती साजरी करण्यासाठी पोलिसांनी परवानगी नाकारल्याचा अखिल भारतीय ब्राह्मण महासंघाच्या कोल्हापूर शाखेच्यावतीने निषेध करण्यात आला आहे.
कोल्हापूर : शनिवारवाडा पुणे येथे परशुराम जयंती साजरी करण्यासाठी पोलिसांनी परवानगी नाकारल्याचा अखिल भारतीय ब्राह्मण महासंघाच्या कोल्हापूर शाखेच्यावतीने निषेध करण्यात आला आहे.
याबाबतचे निवेदन जिल्हाधिकारी कार्यालयात देण्यात आले आहे. अनेक गुन्हेगारी पार्श्वभूमी असलेल्या व्यक्ती व संघटनांना या ठिकाणी सभा घेण्यासाठी परवानगी दिली गेली आहे. मात्र आमच्या संघटनेला ‘कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होण्याची दाट शक्यता आहे’ असे सांगून परवानगी नाकारण्यात आली आहे.
या समाजाविरोधात आगपाखड, शिवीगाळ, अपशब्द, समाजातील थोर पुरूषांच्या पुतळ्यांची तोडफोड, विटंबना, स्वातंत्र्यसेनानींची उपेक्षा हे सर्व या समाजाबाबत गेली अनेक वर्षे सुरू आहे. या पार्श्वभूमीवर परशुराम जयंतीसाठी परवानगी नाकारण्याचा आम्ही निषेध करतो असे या निवेदनात नमूद करण्यात आले आहे.
निवेदनावर अखिल भारतीय ब्राह्मण महासंघाचे राष्ट्रीय महासचिव शाम जोशी, कोल्हापूर शहर अध्यक्ष देविदास सबनीस, वकील आघाडीचे प्रदेश उपाध्यक्ष अॅड. सी. जी. कुलकर्णी, जिल्हा उपाध्यक्ष केदार पारगांवकर, उदय महेकर, जिल्हा चिटणीस सुधीर सरदेसाई, श्रुती मराठे यांच्या सह्या आहेत.