कोल्हापूर : पंचगंगा काठच्या गावांसाठी २२ कोटींचा प्रकल्प आराखडा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 10, 2019 04:26 PM2019-01-10T16:26:06+5:302019-01-10T16:27:48+5:30
प्रामुख्याने पंचगंगा नदीकाठच्या आणि प्रदूषणासाठी कारणीभूत ठरणाऱ्या ३१ गावांतील सांडपाणी रोखण्यासाठी २२ कोटी रुपयांचा प्रकल्प आराखडा जिल्हा परिषदेच्या वतीने तयार करण्यात आला आहे. शिरोळ तालुक्यातील खिद्रापूर येथे जिल्हा परिषदेच्या जलव्यवस्थापन समितीची बैठक झाली. या बैठकीमध्ये ही माहिती देण्यात आली. अध्यक्षस्थानी जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा शौमिका महाडिक होत्या.
कोल्हापूर : प्रामुख्याने पंचगंगा नदीकाठच्या आणि प्रदूषणासाठी कारणीभूत ठरणाऱ्या ३१ गावांतील सांडपाणी रोखण्यासाठी २२ कोटी रुपयांचा प्रकल्प आराखडा जिल्हा परिषदेच्या वतीने तयार करण्यात आला आहे. शिरोळ तालुक्यातील खिद्रापूर येथे जिल्हा परिषदेच्या जलव्यवस्थापन समितीची बैठक झाली. या बैठकीमध्ये ही माहिती देण्यात आली. अध्यक्षस्थानी जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा शौमिका महाडिक होत्या.
सध्या जिल्ह्यामध्ये पंचगंगा प्रदूषणाचा मुद्दा तापला असून, याबाबत पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी निधी देण्याची ग्वाही दिली आहे. त्यानुसार तातडीचा उपाय म्हणून सांडपाणी साठविण्यासाठी स्थिरीकरण तळे आणि बायोरेमिडिएशन पद्धतीद्वारे हे सांडपाणी नदीत जाण्यापासून थांबविण्यासाठी २२ कोटी रुपयांचा हा प्रकल्प आराखडा तयार करण्यात आला आहे. बायोरेमिडिएशन पद्धतीमध्ये सांडपाण्यावर प्रक्रिया करणारे बॅक्टेरिया विकसित करण्यात आले असून, त्याचा वापर करण्याचे नियोजन आहे.
शाळा, अंगणवाड्यांच्या स्वच्छतागृहांचेही सर्वेक्षण करण्याच्या यावेळी सूचना देण्यात आल्या. यावेळी बांधकाम सभापती सर्जेराव पाटील पेरीडकर, महिला बालकल्याण सभापती वंदना मगदूम, जलव्यवस्थापन समितीचे सदस्य बंडा माने, प्रा. शिवाजी मोरे, अॅड. हेमंत कोलेकर, राणी खमेलट्टी, तसेच राजवर्धन निंबाळकर, अशोकराव माने, मुख्य कार्यकारी अधिकारी अमन मित्तल, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी रवी शिवदास, पाणी व स्वच्छता विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी प्रियदर्शिनी मोरे, ग्रामीण पाणीपुरवठा विभागाचे प्र. कार्यकारी अभियंता मनीष पवार, जीवन प्राधिकरणचे कार्यकारी अभियंता ना. बा. भोई, शिरोळचे गटविकास अधिकारी विजयसिंह जाधव उपस्थित होते.
जैनापूर येथे सांडपाणी प्रकल्पाचे उद्घाटन
जैनापूर येथील सांडपाणी प्रकल्पाचे उद्घाटन शौमिका महाडिक यांच्या हस्ते करण्यात आले. यापूर्वी गावात निर्माण होणारे सांडपाणी ग्रामपंचायतीच्या समोर साचून राहायचे, त्यामुळे गावात स्वच्छता आणि आरोग्याचे प्रश्न उभे राहिले होते.
या प्रकल्पांतर्गत तीन स्थिरीकरण तळी घेण्यात आली आहेत. या तळ्यांतून शुद्ध होणारे पाणी हे शेतीसाठी वापरले जाणार आहे. या प्रकल्पाची अंदाजपत्रकीय रक्कम रु. १७.९१ लक्ष इतकी असून, या कामासाठी प्रत्यक्ष १०. ७० लक्ष इतका खर्च झालेला आहे.
यावेळी राम शिंदे, सभापती अर्चना चौगले, उपसभापती संजय माने, पं. स. सदस्य सुरेश कांबळे, राजगोंड पाटील यांच्यासह सरपंच व अन्य पदाधिकारी उपस्थित होते.