कोल्हापूर : शेतकऱ्यांचा रस्त्यावरच ठिय्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 11, 2018 06:51 PM2018-12-11T18:51:49+5:302018-12-11T18:59:40+5:30
अखिल भारतीय किसान सभेने सांगली ते कोल्हापूर अशी काढलेली पायी दिंडी पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या कार्यालयासमोर जाण्याआधीच पोलिसांनी रोखली. मोर्चाची पूर्वकल्पना देऊनही पालकमंत्री गैरहजर राहिल्याने संतापलेल्या शेतकऱ्यांनी त्यांचा निषेध नोंदवत रस्त्यावरच ठाण मांडत आंदोलन सुरू केले.
कोल्हापूर : अखिल भारतीय किसान सभेने सांगली ते कोल्हापूर अशी काढलेली पायी दिंडी पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या कार्यालयासमोर जाण्याआधीच पोलिसांनी रोखली. मोर्चाची पूर्वकल्पना देऊनही पालकमंत्री गैरहजर राहिल्याने संतापलेल्या शेतकऱ्यांनी त्यांचा निषेध नोंदवत रस्त्यावरच ठाण मांडत आंदोलन सुरू केले.
पालकमंत्र्याचे स्वीय सहायक बाळासाहेब यादव यांनी १ ते १० जानेवारीदरम्यान बैठक बोलावण्याचे लेखी आश्वासन दिल्यानंतरच तब्बल अडीच तास रोखून धरलेला मार्ग आंदोलकांनी मोकळा केला.
अखिल भारतीय किसान सभेचे राज्य सचिव सुभाष देशमुख व उदय नारकर यांच्या नेतृत्वाखाली मंगळवारी कावळा नाका येथील पालकमंत्र्यांच्या कार्यालयासमोर आंदोलन केले.
नागपूर-रत्नागिरी महामार्गबाधित शेतकऱ्यांना न्याय द्या, देवस्थान इनाम वर्ग-३ ची जमीन खालसा करा, या मागण्यांसाठी सोमवारी सकाळपासून सांगलीतून शेतकऱ्यांच्या पायी दिंडीला सुरुवात झाली. १५० शेतकरी ५२ किलोमीटर अंतर चालत मंगळवारी दुपारी सव्वा वाजता कावळा नाका येथे आले.
जुन्या विश्रामगृहातील पालकमंत्र्यांच्या कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन करण्यासाठी ते जात असतानाच पोलिसांनी त्यांना रोखले. कार्यालयाचे फाटक बंद करून तेथे चाळीसभर पोलिसांचा पहारा ठेवल्याने चिडलेल्या आंदोलकांनी रस्त्यावरच ठिय्या मारला. त्यामुळे कसबा बावड्याकडे जाणारी वाहतूक एकेरी करण्यात आली.
आंदोलकांसमोर बोलताना उमेश देशमुख म्हणाले,‘ पालकमंत्र्यांनी अनुपस्थित राहून चालत आलेल्या शेतकऱ्यांचा अपमान केला आहे. भेटीची वेळ दिल्याशिवाय येथून उठणार नाही.
उदय नारकर म्हणाले, पालकमंत्री स्वत:ला ‘दादा’ म्हणवतात; पण दादासारखे वागत नाहीत. ते उपस्थित राहून शेतकऱ्यांचे म्हणणे ऐकून घेतील असे वाटले होते; पण ते बोलतात तसे करीत नाहीत. प्रा. डॉ. सुभाष जाधव यांनी ‘सिटू’ आंदोलकांच्या मागे ठामपणे उभी राहील असे सांगितले. यावेळी दिगंबर कांबळे, गुलाब मुल्लाणी, सुभाष निकम, संभाजी यादव यांची उपस्थिती होती.
पोलिसांचीच संख्या जास्त
आंदोलनस्थळी आंंदोलकांपेक्षा पोलिसांचीच संख्या जास्त होती. सांगलीपासून ते कोल्हापुरात येईपर्यंत या आंदोलकांच्या पुढे आणि मागे अशा दोन पोलीस गाड्या लावण्यात आल्या होत्या. कोल्हापुरात आंदोलक दाखल होण्यापूर्वी आणखी दोन गाड्या भरून पोलीस आंदोलनस्थळी दाखल झाले होते. राज्य राखीव पोलीस दलासह जवळपास २०० पोलिसांमुळे आंदोलनस्थळाला पोलीस छावणीचे स्वरूप आले.
राजस्थानातून सुरुवात
आंदोलनातील शेतकऱ्याला बंदोबस्तातील पोलिसाने ‘कशाला एवढ्या लांब उन्हातान्हात चालत आलाय?’ असे विचारले. यावर त्या शेतकऱ्यांने ‘आता सरकारला घरी घालवूनच परत जाणार आहे. राजस्थानातील शेतकऱ्यांनी सुरुवात केली आहे, आता पुढचा नंबर महाराष्ट्राचा आहे, अशी सूचक टिप्पणीही केली.