कोल्हापूर पब्लिक स्कूलचे ‘स्काऊट गाईड्स’ निघाले लंडनला
By Admin | Published: July 29, 2016 12:07 AM2016-07-29T00:07:53+5:302016-07-29T00:33:19+5:30
कोल्हापूर स्काऊटकडून सत्कार : चार्नवूड येथे होणाऱ्या जागतिक जांबोरीसाठी निवड
कोल्हापूर : लंडनमधील चार्नवूड येथे दि. २९ जुलै ते ७ आॅगस्टदरम्यान होणाऱ्या जागतिक स्काऊड गाईड जांबोरीसाठी निवड झालेला कोल्हापूर पब्लिक स्कूलचा संघ आज, शुक्र वारी लंडनला रवाना होणार आहे. यानिमित्ताने त्यांचा जिल्हा स्काऊट चिटणीस डॉ. व्ही. एस. पोवार यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.
कोल्हापूर भारत स्काऊटस् आणि गाईड्सतर्फे बुधवारी विद्यार्थ्यांचा सत्कार व शुभेच्छा समारंभाचे आयोजन करण्यात आले होते. याप्रसंगी जिल्हा प्रशिक्षक बी. ए. पोटे, जिल्हा संघटक विक्रांत देशपांडे, तावडे फौंडेशनचे किशोर तावडे, आदी उपस्थित होते.
यावेळी डॉ. पोवार यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. ते म्हणाले, आंतरराष्ट्रीय पातळीवरील एका मोठ्या समारंभासाठी कोल्हापूरच्या संघाची निवड होणे ही अभिमानाची गोष्ट आहे. या व्यासपीठाद्वारे आपली संस्कृती जगासमोर मांडण्याची संधी विद्यार्थ्यांना मिळत आहे.
यावर्षी सन २०१६ ची जांबोरी चार्नवूड, लंडन येथे होत आहे. भारतातून ७२ स्काऊटस् गाईड्स व लिडर्स सहभागी होणार आहेत. त्यामध्ये कोल्हापूर पब्लिक स्कूलच्या ७ स्काऊटस, ४ गाईड्स व २ लिडर्सना महाराष्ट्राचे प्रतिनिधित्व करण्याची संधी मिळाली आहे.
या जांबोरीसाठी जिल्हा गाईड कमिशनर शोभा तावडे या ‘इंडियन काँटिजंट लिडर’ म्हणून सहभागी होत आहेत. यापूर्वी त्यांनी आॅस्ट्रेलिया येथे झालेल्या आंतरराष्ट्रीय स्काऊट वर्कशॉपमध्ये सहभागी झाल्या होत्या. याच कार्याची दखल घेऊन राष्ट्रीय स्काऊट गाईड कार्यालयाने त्यांच्यावर ही जबाबदारी सोपविली आहे. (प्रतिनिधी)